हैदराबाद – आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने कौशल्य विकास घोटाळा प्रकरणात अखंड आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना आज नियमित स्वरूपाचा जामीन मंजूर केला. नायडू यांना न्यायालयाने यापूर्वी 28 नोव्हेंबरपर्यंत जामीन दिला होता, तथापि, तो अंतरिम स्वरूपाचा होता. नायडू यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायची असल्यामुळे त्यांना जामीन दिला जावा अशी विनंती त्यांच्या वकिलाने न्यायालयाला केली होती.
दरम्यान, उपचारांची सविस्तर माहिती आणि एक लाखाचा बॉंड या अटींवर न्यायालयाने त्यांना जामीन मंजुर केला आहे. नायडू जेंव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेंव्हा कथितपणे 3300 कोटी रूपयांचा कौशल्य विकास घोटाळा झाला असल्याचा आरोप असून त्याच प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. युवकांची रोजगार क्षमता वाढवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याच्या संदर्भातील ही योजना होती. त्यात घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यावर सीआयडीने मार्च महिन्यात चौकशी सुरू केली होती.