कोलकाता – प. बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे.
भट्टाचार्य यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर त्यांच्या निवासस्थानीच उपचार करण्यात येत होते. मात्र, मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक ढासळली. त्यांची ऑक्सिजन पातळी 80 टक्क्यांपेक्षा कमी झाली. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांना याशिवाय अन्य सहव्याधी असल्याने ते चिंतेचे कारण आहे.
सोमावारपासून त्यांना व्यवस्थित चालता येत नव्हते. त्यांना सातत्याने बायपॅपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा द्यावा लागत असे. त्यांची करोना चाचणी अलीकडेच पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्या पत्नी करोनातून बऱ्या होऊन सोमवारीच घरी आल्या होत्या. यापूर्वीही भट्टाचार्य यांना रुग्णालयात दाखल होण्याच सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र, त्यांनी तो ऐकला नव्हता.