भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आघाडीवर

नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून, राज्यात सुरूवातीचे कल युतीचे बाजूने येताना दिसत आहे. मात्र, भोकर मतदारसंघातून रिंगणात असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पहिल्या काही फेऱ्यांमध्ये आघाडी घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार अशोक चव्हाण हे भोकर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाचे श्रीनिवास गोरठेकर हे निवडणूक लढवत आहेत. वंचित बहुजन आघाडीनेही नामदेव आयलवाड यांना उमेदवारी दिली आहे. भोकर हा अशोक चव्हाणांचा मतदारसंघ असून त्यांचे पारडे जड आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांना वंचित आघाडीच्या उमेदवारामुळे पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे वंचित फॅक्‍टरही महत्त्वाचा ठरणार आहे.

विधासभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याविषयी वेगवेगळ अंदाज व्यक्त करण्यात येत होते. विशेष म्हणजे महाराष्ट्रात पुन्हा युतीचेच सरकार येणार असं एग्झिट पोलमधून दिसत होते. मात्र, मागील काही निवडणुकीत पोलचे अंदाज चुकले आहेत त्यामुळे प्रत्यक्ष निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होईपर्यंत भाजपा-शिवसेना युतीला कुणाचे आव्हान दिसत नव्हते. पण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचाराचा झंझावात निर्माण करत एकतर्फी प्रचारात रंगत आणली. शरद पवार यांच्या सभांमुळे राष्ट्रवादीला चांगले यश मिळू शकते, असा सूर चर्चेतून उमटत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.