रायपूर : छत्तीसगडमधील बहुचर्चित २ हजार १६० कोटींच्या कथीत दारू घोटाळा प्रकरणात कॉंग्रेस आमदार आणि माजी राज्य उत्पादन शुल्क मंत्री कावसी लखमा यांना बुधवारी ईडीने अटक केली. तसेच त्यांचा मुलगा हरीश लखमा याच्यावरही अटकेची कारवाई करण्यात आली. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) विशेष न्यायालयात त्यांना हजर केले असता त्यांना २१ जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.
केंद्रीय तपास यंत्रणेने मनी लाँडरिंग प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून कावसी लखमा आणि त्यांचा मुलगा हरीश यांना बुधवारी पाचपेडी नाका परिसरातील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवले होते. सदर चौकशीनंतर लखमा यांना दुपारी अटक करण्यात आली. यापूर्वी २८ डिसेंबर रोजी रायपूर, सुकमा आणि धमतरी जिल्ह्यातील त्यांच्या मालमत्तांवर छापे टाकण्यात आले होते.
तत्पूर्वी, न्यायालयात प्रवेश करण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना आदिवासी नेत्याने लखमा यांनी दावा केला की, छाप्यांमध्ये तपास यंत्रणेला कोणतेही कागदपत्र किंवा एक पैसाही सापडला नाही. तरीही मला खोट्या प्रकरणात तुरुंगात पाठवण्यात येत आहे, असे ते म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री विष्णू देव साई हे आदिवासीबहुल बस्तर प्रदेशाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.
राज्यात पंचायत निवडणुका होणार असल्याने, ते मला निवडणुकीपासून दूर ठेवू इच्छितात, असा आरोपही लखमा यांनी केला. दरम्यान, काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ईडीची कारवाई भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या निर्देशांवर काम करत असल्याचा आरोप केला.