अबुधाबी – गोलंदाजांच्या सरस कामगिरीनंतर भानुका राजपक्षे व अविष्का फर्नांडो यांच्या जबाबदार फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील साखळी लढतीत नामिबीयाचा 7 गडी राखून पराभव केला.
या विजयाच्या जोरावर श्रीलंकेने सुपर 12 गटात पात्र ठरण्यासाठी आश्वासक वाटचाल केली आहे. नामिबीयाचा डाव 96 धावांत संपला. कमी धावसंख्येचा पाठलाग करतानाही श्रीलंकेचा डाव 3 बाद 26 असा संकटात सापडला होता. त्यानंतर मात्र राजपक्षे व फर्नांडो यांनी जबाबदारीने फलंदाजी केली व संघाचा विजय साकार केला.
राजपक्षेने 27 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 42 धावा केल्या. फर्नांडोनेही त्याला सुरेख साथ देताना 30 धावांची खेळी केली. माहेश थेकष्णासह अन्य गोलंदाजांनी केलेल्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या गट साखळी सामन्यात नामिबियाचा डाव केवळ 96 धावंत संपुष्टात आणला.
संक्षिप्त धावफलक
नामिबिया – 19.3 षटकांत सर्वबाद 96 धावा. (क्रेग विल्यम्स 29, गेरहार्ड इरॅस्मस 20, जेजे स्मिथने 12, माहेश थेकष्णा 3-25, लाहिरू कुमारा 2-9, वनिंदू हसरंगा 2-24). श्रीलंका – 13.3 षटकांत 3 बाद 100 धावा. (भानुका राजपक्षे नाबाद 42, अविष्का फर्नांडो नाबाद 30, जेजे स्मिथ 1-7, बर्नार्ड शुल्ट्झ 1-16, रुबेन ट्रम्पेलमन 1-27).