INDvsWI : “सर्फराजकडे दुर्लक्ष तर पुजाराला…”,गावसकरांची ‘निवडकर्त्यां’वर आगपाखड

नवी दिल्ली :- वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी व एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा झाली. या संघात रणजी स्टार सर्फराज खानकडे दुर्लक्ष तर चेतेश्वर पुजाराला बळीचा बकरा बनविल्याबद्दल भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी राष्ट्रीय निवडकर्त्यांवर आगपाखड करत टीका केली आहे.
सर्फराजकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी त्याला, “जर रणजी स्पर्धेतील कामगिरीचा राष्ट्रीय संघातील निवडीसाठी विचार होणार नसेल तर ही स्पर्धा खेळू नकोस’ असा थेट सल्लाच दिला आहे. तसेच त्यांनी संघ निवडताना प्रमुख देशांतर्गत स्पर्धा असणाऱ्या रणजी या भारतातील लाल चेंडूवरील स्पर्धेतील विक्रम लक्षात घेण्याऐवजी जर आयपीएलमधील कामगिरी विचारात घेतली जाणार असेल तर रणजी करंडक घेण्यामागील तर्कावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
“सरफराज खानने गेल्या तीन हंगामात 100 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याला संघात स्थान मिळविण्यासाठी आणखी काय करावे लागेल?’ असा सवालही त्यांनी विचारला आहे.
सर्फराजने तीन शतकांच्या मदतीने 2022-23 रणजी करंडकामध्ये सहा सामन्यांत 92.66 च्या सरासरीने 556 धावा केल्या होत्या. यासह 25 वर्षीय उजव्या हाताच्या या फलंदाजाने 2021-22 च्या रणजी मोसमात 122.75च्या सरासरीने 982 धावा केल्या होत्या, ज्यात चार शतकांचाही समावेश होता. तसेच, सर्फराजने एकूण 37 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 79.65 च्या सरासरीने 3,505 धावा केल्या आहेत ज्यात 13 शतकांचा समावेश आहे.
फॉलोअर्स नसल्याने पुजारला डच्चू…?
पुजाराबद्दल बोलताना गावसकर म्हणाले, “विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या इतर काही भारतीय स्टार्सप्रमाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो फॉलोअर्स नसल्यामुळे कोणालाही वगळण्याचे कारण नाही. फलंदाजीच्या अपयशासाठी एकट्या पुजाराला बळीचा बकरा का बनविण्यात आले आहे? तो भारतीय क्रिकेटचा एक निष्ठावान सेवक आहे, एक शांत आणि सक्षम कर्तृत्ववान आहे. पण कोणत्याही प्लॅटफॉर्मवर त्याचे लाखो फॉलोअर्स नसल्यामुळे आवाज उठवता येणार नाही म्हणून त्याला वगळले का? त्याला वगळण्याचा आणि अयशस्वी झालेल्या इतरांना ठेवण्याचा निकष काय आहे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.
आशियाई स्पर्धेसाठी दोन्ही संघ पाठवणार
चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धा-2023साठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी बीसीसीआय आपले पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठविणार आहे. यावेळी 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. यापूर्वी, बीसीसीआयने 2010 व 2014 या आशियाई स्पर्धेत भारताने संघ पाठवले नव्हते. तर 2018 मध्ये जकार्तातील स्पर्धेत क्रिकेटला वगळण्यात आले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये आयोजित केली जाते.





