कोलकाता – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुली यांना आता आयसीसीच्या कार्याध्यक्षपदाचे वेध लागले आहेत. सध्याचे अध्यक्ष व बीसीसीआयचे माजी पदाधिकारी शशांक मनोहर यांची मुदत येत्या जुलै महिन्यात संपणार असून त्या जागी गांगुली यांची नियुक्ती व्हावी अशी इच्छा बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळांनी व्यक्त केल्याने गांगुलीला पाठिंबा वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
यापूर्वी इंग्लंडचे माजी कसोटीपटू डेव्हिड गावर यांनीही गांगुलीच्याच नावाचा उल्लेख केला होता. अर्थात इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष कॅलिन ग्रोव्ह हे देखील या पदासाठी इच्छुक आहेत. मात्र, अनेक देशांचा पाठिंबा गांगुली यांना असल्याचे स्पष्ट होत असून खुद्द गांगुलीदेखील यासाठी अनेक देशांचा पाठिंबा कायम राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
4 वर्षांपूर्वी आयसीसीचे तटस्थ कार्याध्यक्ष म्हणून मनोहर यांची नियुक्ती केली गेली होती. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी त्यांना मुदतवाढही देण्यात आली होती. मनोहर बीसीसीआयचे माजी पदाधिकारी असूनही त्यांनी सातत्याने ऑस्ट्रेलिया व इंग्लंड मंडळाच्याच बाजुने आपली भूमिका ठेवली होती व त्यावेळी त्यांचे व बीसीसीआयच्या सदस्यांमध्ये तेढ निर्माण झाली होती.
बीसीसीआयची फिल्डिंगही सुरू…
सौरव गांगुली यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी जरी निवड झालेली असली तरीही लोढा समितीच्या नियमांनुसार एका पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्या सदस्याला पुढील तीन वर्षे क्रिकेट व्यवस्थापनातील अन्य कोणत्याही पदावर राहता येत नाही. याच नियमाचा फटका गांगुलीला बसण्याची शक्यता असून त्यासाठी बीसीसीआयच्या घटनेतही बदल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले जात आहे. जर याला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली तरच गांगुली यांना आयसीसीचे पद स्वीकारता येणार आहे. मात्र, त्यापूर्वी त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल.