जॉनपूर – उत्तर प्रदेशातील एक जल प्रकल्पातील अधिकाऱ्याचे अपहरण करून त्याला धमकावल्याच्या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी बहुजन समाज पक्षाचे माजी खासदार धनंजयसिंह यांना अटक केली आहे.
धनंजयसिंह यांना त्यांच्या कालीकुट्टी भागातील निवासस्थानी पोलीस पथकाने ताब्यात घेतले आणि नंतर त्यांना रितसर अटक केली. त्यांनी अभिनव सिंघल नावाच्या अधिकाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण केल्याचा आरोप होता.
याप्रकरणी स्वत: सिंघल यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. धनंजयसिंह यांची चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. धनंजयसिंह यांनी या आरोपांचा इन्कार केला असून आपल्याला राजकीय वैमनस्यातून अडकवले गेले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या अटकेचा निषेध केला आहे.