मुंबई – भाजपचे माजी आमदार विजय गव्हाणे यांनी पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे घड्याळ आपल्या हाती बांधले आहे. विजय गव्हाणे हे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याचे वृत्त होते आणि ते लवकरच भाजप सोडणार असल्याची चर्चा होती. अखेर आज विजय गव्हाणे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षात निष्ठावंतांचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप गव्हाणे यांनी केला. गेल्या 20 वर्षांपासून गव्हाणे भारतीय जनता पक्षात होते.
विजय गव्हाणे यांच्या प्रवेशामुळे आता परभणीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांत याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला नक्कीच फायदा होईल, असे बोलले जात आहे. विजय गव्हाणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर जयंत पाटील म्हणाले, विजय गव्हाणे यांचे स्वागत, ते मनाने आणि विचाराने तिकडे गेले होते असे जाणवले नाही. राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले अनेक जण आहेत जे परतीच्या मार्गावर आहेत, असे त्यांनी सांगितले.