नवी दिल्ली – कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बी.एस.येडियुरप्पा यांच्या सरकारसमोर पुन्हा एकदा मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे कर्नाटकातील माजी मंत्री रमेश जारकीहोली यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या तरुणीने आता आणखी एक व्हिडीओ जारी केला आहे. हा 4.27 मिनिटांच्या व्हिडीओतून तिने आपल्या व आपल्या पालकांच्या जीवाला जारकीहोली यांच्याकडून धोका असल्याचे सांगितले आहे.
या व्हिडियोत तरुणी म्हणाली आहे की, ‘ मला आता हा मानसिक छळ सहन होत नाहीए त्यामुळे मी त्याच्या हातून मरण्यापेक्षा स्वत:चा जीव घेईन, जारकीहोली यांनी मला धमकी दिली आहे. असून ते ते या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहेत. ते सांगतात की त्यांनी मनात आणलं तर एका दिवसात राज्यातील सरकार पडेल. त्यासाठी त्यांना कितीही पैसा ओतावा लागला तरी चालेल. ते सगळ्यांना तुरुंगात धाडतील. याचा काय अर्थ आहे? ते काहीही करू शकतात.’ असं म्हणत तिने या व्हिडियोत अनेक खुलासे केले आहे.
तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी सदर महिलेचे व जारकीहोली यांचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्या व्हिडीओत ती व माजी मंत्री रमेश जारकीहोली हे आक्षेपार्ह स्थितीत दिसत होते. या प्रकरणात भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी या मौन बाळगले होते. ज्या रमेश यांच्यावर आरोप करण्यात येत आहे त्यांनाही यासंदर्भात कोणतही भाष्य केलेले नाही. रमेश यांनी आपला फोन बंद ठेवला होता. ६० वर्षीय रमेश हे सत्तेत असणाऱ्या भाजपाच्या येडियुरप्पा सरकारमधील महत्वाचे मंत्री आहेत. रमेश हे कर्नाटकमधील बेळगावमधील लोकप्रिय मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांनी २०१९ मध्ये काँग्रेसचे १७ आमदार फोडण्यामध्ये भाजपाला मदत केली होती. याच घटनेनंतर भाजपाला राज्यात सरकार बनवता आले आणि जुलै २०१९ मध्ये येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार सत्तेत आले.
मुख्यमंत्री पदाची इच्छा बाळगणारे रमेश यांचे संपूर्ण कुटुंबच राजकारणामध्ये सक्रीय आहे. बेळगावमध्ये रमेश आणि त्यांचे तीन भाऊ हे सक्रीय राजकारणामधील आघाडीचे नेते आहेत. रमेश यांची ही सेक्स रॅकेटसंदर्भातील सीडी बेळगाव लोकसभेच्या जागेसाठी असणाऱ्या पोटनिवडणुकीच्याआधी समोर आली आहे. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर मागील वर्षी लोकसभेची ही जागा रिक्त झाली आहे.