पुण्याच्या इतिहासाचा सत्ताधाऱ्यांना विसर – राज ठाकरे

महाराष्ट्रातल्या गड-किल्ल्यांची अवस्था दयनीय

पुणे – पुण्याला वैभवशाली इतिहासाची परंपरा असून या इतिहासाचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला आहे. महाराष्ट्रातल्या गड-किल्ल्यांची अवस्था दयनीय झाली असून त्यांचे संवर्धन करा, हीच शिवरायांना खरी मानवंदना ठरेल, असे प्रतिपाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी केले.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी, मनसेचे शहरातील उमेदवार उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, इतिहास टिकविण्याचे काम सरकारने करायचे असते. समुद्रात शिवस्मारक करण्याचे आश्‍वासन आघाडीच्या काळात व भाजपच्या सरकारने देऊनही अद्याप काम सुरू झाले नाही. याउलट, गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक उभारूनही झाले. मात्र, शिवस्मारक का उभं रहात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कोल्हापूर, सांगलीतील पुरातून पुण्यातील कोथरुड मतदारसंघापर्यंत सरकारमधील एक नेता वाहत आल्याची, कोपरखळीही त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मारली.

भाजपला केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळूनही प्रगतीचा आलेख खालावत गेला. सरकारची “मेक इन इंडिया’ योजना फसवी असून नोटाबंदीने देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. तसेच, राज्यातील मराठी भाषा व इतिहास टिकविण्यासाठी कोणताही प्रयत्न केला जात नाही. मनसेची नाशिकमध्ये सत्ता असतानाही महापालिकेच्या माध्यमातून केलेली कामे स्मार्ट सिटीत दाखवून श्रेय घेण्याचा पराक्रम भाजपने केला आहे. याचबरोबर, राज्यातील बॅंका बुडविण्याचे पाप सत्ताधारी पक्षाने केले आहे.

यामुळे, महाराष्ट्राला सक्षम विरोधी पक्षाची गरज असून सरकारला विधानसभेत धारेवर धरण्यासाठी मनसेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे, आवाहन ठाकरे यांनी केले.

पुण्यात शिवसेनेचा एकही उमेदवार उभा नाही. संपूर्ण राज्यात शिवसेनेला मागच्या पावलावर ठेवण्याचे काम भाजपने केले आहे. भाजप शिवसेनेची अब्रू काढत असूनही त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नाही. त्यामुळे, शिवसेनेची निवडणुकीपूर्वी एकहाती भगवा फडकविण्याची वल्गना हवेतच गेल्याची, टीका राज ठाकरेंनी केली.

मनसेचे उमेदवार चंपाचा चंपी करणार
राज ठाकरे सभेच्या सुरुवातीला कोल्हापूर, सांगली, पुण्याला अतिवृष्टीने बसलेल्या तडाख्याचा संदर्भ देत होते. यावेळी गर्दीतून चंपा, चंपा अशा जोरदार घोषणा सुरू झाल्या. यावेळी मनसेचे उमेदवार चंपाचा चंपी करणार असल्याचे, सांगत राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत पुणेकर नावं ठेवण्यात पटाईत असल्याची, कोटीही त्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.