फडणवीस यांच्या आश्‍वासनांचा पुणे पालिकेला विसर

नगरसेवक गणेश ढोरे; फुरसुंगी-उरुळी देवाची येथील भूमी ग्रीन कचरा प्रक्रिया प्रकल्पास विरोध

फुरसुंगी – उरूळीदेवाची-फुरसुंगी येथील कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्याचे कबूल करीत हा डेपो अन्यत्र नेण्यात येईल, असे आश्‍वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार पिंपरी-सांडस व अन्यत्र शासकीय जागा उपलब्ध करण्यात आल्या. परंतु, अद्यापही शहरात व इतर ठिकाणी राज्य शासनाने देऊ केलेली जागा कचरा प्रकल्पासाठी ताब्यात घेण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरली आहे. पालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाही त्यांना त्यांच्या पक्षाचे नेते फडणवीसांच्या आश्‍वासनाचा विसर पडलेला दिसतो. यामुळेच येथे कोणताही कचरा डेपो सुरू करू दिला जाणार नाही, असा कडक इशारा देण्यात येत असल्याचे पालिकेत समाविष्ट 11 गावांचे नगरसेवक गणेश ढोरे यांनी सांगितले.

फुरसुंगी-उरुळी देवाची येथील कचराडेपोवर सुरु होणाऱ्या 200 मेट्रीक टनाच्या भूमी ग्रीन कचरा प्रक्रिया प्रकल्पास विरोध असून कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प येथे आम्ही सुरू होऊ देणार नाही, पालिकाप्रशासनाने या प्रकल्पासंदर्भात कोणतेही बिल अदा करु नये. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रवादीचे नगरसेवक ढोरे यांनी पालिका आयुक्तांना दिला आहे.

नगरसेवक गणेश ढोरे म्हणाले की, पुणे शहराचा बहुतांशी कचरा गेल्या 25 वर्षांपासून उरूळीदेवाची व फुरसुंगी कचरा डेपो येथे टाकण्यात येत आहे. न्यायालयीन आदेशानुसार शहराच्या विविध भागात लहान-मोठे प्रक्रिया प्रकल्प उभारणे गरजेचे असताना पालिकेकडून अद्यापही उरुळीदेवाची-फुरसुंगी येथेच कचरा आणला जात आहे. पुणे मनपाचे लहान-मोठे अन्य प्रकल्प निरुपयोगी ठरले असून सदर प्रकल्पांपैकी बहुतांशी प्रकल्प बंद अथवा खूप कमी कालावधी करता सुरू असतात. याकालावधीत सर्व कचरा उरळी-फुरसुंगी डेपोतच आणला जातो आहे.

विषयांकित कचराडेपोवर 200 टनाचा 15 वर्ष मुदतीकरीता नवीन कचरा प्रकल्प सुरु करण्यासाठी मनपाने वर्कऑर्डर दिली आहे. यास आमचा तीव्र आक्षेप आहे. हरित लवादाच्या आदेशाचे उल्लंघन व स्वत: सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा अवमान करून पालिकेकडून सदर ठिकाणी राजरोसपणे 9 लाख टन पेक्षा अधिक कचरा ओपन डम्पिंग केला जात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या आश्‍वासनानुसार सदरचा कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्याऐवजी आता नव्याने 200 मे. टनाच्या प्रकल्प चालू करण्यासाठी टेंडर प्रक्रियेला दि.27/02/2020ला पुणे मनपा स्थायी समितीने 15 वर्ष मुदतीकरता मंजूरी देऊन, कचराडेपो पुढील 15 वर्ष सुरू ठेवण्याचा कट रचला आहे. यास ऊरूळीदेवाची-फुरसुंगी नागरिकांचा तीव्र विरोध आहे.

गेल्या 25 ते 30 वर्षांपासून कचरा डेपोचा त्रास ग्रामस्थ सहन करीत असल्यामुळे हा प्रकल्प आपण इतर ठिकाणी स्थलांतरीत करावा. ऊरूळी देवाची-फुरसुंगी कचरा डेपोच्या जागेवर कोणताही प्रक्रिया किंवा विनाप्रक्रिया स्वरूपाचा कचरा टाकू नये, याठिकाणी कोणतीही नविन टेंडर प्रकिया राबवून कचरा प्रकल्प राबवू नये, पुणे शहराच्या अन्य ठिकाणी नविन जागा शोधून तेथे कचराडेपो करावा, माझ्या प्रभागातील गावांमध्ये कोणत्याही परिस्थितीत यापुढील काळात कचरा टाकण्यास व कचरा प्रकल्पास कडक विरोध केला जाईल.

राज्य शासनाच्या प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून काही सशर्त अटी शर्तीवर सदर कचरा प्रक्रिया प्रकल्प चालवण्यास मंजुरी घेतली आहे. सदर मंजुरी ही आक्षेपार्ह असून याठिकाणी कोणताही कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यास आमचा विरोध आहे. तरीही सशर्त परवानगीमधील अटी शर्तीच देखील पालन न करता सदर जागेवर नाममात्र स्ट्रक्‍चर उभारले असताना ठेकेदारास 6.25 कोटी रुपये देण्याचा प्रशासनाने कट रचला आहे. याबाबत मी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे ग्रामस्थांच्या वतीने तक्रार करणार आहे.
– गणेश ढोरे, नगरसेवक (समाविष्ट 11 गावे)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.