अबाऊट टर्न: भूल

हिमांशू
“हाऊ डेअर यू…’ असा खडा सवाल जगभरातल्या शीर्षस्थ नेत्यांना करणारी अवघी सोळा वर्षांची निडर ग्रेटा थनबर्ग आठवते? हो, तीच. आठवड्यातून एक दिवस शाळेला दांडी मारून स्वीडनच्या संसदेसमोर बसून सत्याग्रह करणारी. प्रत्येक आठवड्यात हातात पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे फलक घेऊन बसणारी ही चिमुरडी कोण, याचं कुतूहल हळूहळू वाढत गेलं. तिला लोकांचा पाठिंबा मिळू लागला. पाहता-पाहता तिच्या मागे जगभरातला मोठा समुदाय उभा ठाकला. ज्या दिवसापासून तिने हा उपक्रम सुरू केला, पुढील वर्षी त्याच दिवशी जगभरात निदर्शनं झाली.

जागतिक तापमानवाढीच्या संकटानं किती उग्र रूप धारण केलंय, याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न पर्यावरणवादी संघटनांनी जगभर केला. अर्थात असे आवाज आजवर नेहमीच क्षीण ठरले आहेत; परंतु ते “आहेत’ हेच मोठं आहे. कारण हे आवाज नसते, तर हवामान बदल ही “समस्या’ आहे आणि ती मुख्यत्वे मानवनिर्मित आहे, हेच मुळात आपल्याला समजलं नसतं. आर्थिक विकासाच्या ज्या मॉडेलच्या तालावर आपण सुसाट धावतो आहोत, त्या वेगात तर अशा “किरकोळ’ गोष्टींकडे पाहायला आपल्याला सवडच नाहीये. या मॉडेलच्या कर्त्याधर्त्यांचा दबाव जगभरातील सरकारांवर आहे आणि त्यामुळंच आपली सुंदर पृथ्वी संकटात आहे, हे मान्य करायला कुणीच तयार नाही. अशा नेत्यांना ग्रेटाने सार्वजनिकरीत्या विचारलं होतं, “हाऊ डेअर यू…’

माद्रिदमध्ये सुरू असलेल्या संयुक्‍त राष्ट्र हवामान चर्चेत ग्रेटाचं भाषण नुकतंच झालं. जगभरातले नेते आणि कंपन्यांचे अधिकारी आपल्याला आकडेवारी आणि माहितीविषयी अंधारात ठेवत आहेत, हा सूर तिने पुन्हा आळवला. जगभरातले नेते वाटाघाटी तर करतात, पण कोणतीही कृती सुरू होत नाही. जगात “हवामान आणीबाणी’ आहे. पृथ्वीच्या वाढत्या तापमानाच्या प्रत्येक अंशाचा एकेक छोटासा भागसुद्धा महत्त्वाचा असून, त्यामुळं आपल्यावर अनेक दुष्परिणाम होत आहेत, हे ग्रेटाने निदर्शनास आणून दिलं. राजकारणी आणि मोठ्या कंपन्यांवर तिने निडरपणे प्रहार केला. ग्रेटाच्या बोलण्यात “हवामानाबाबत केली जात असलेली दिशाभूल’ हा नेहमी प्रमुख मुद्दा असतो.

जागतिक तापमानवाढ आणि हवामानातील बदल रोखण्यासाठी कार्बन उत्सर्जन रोखणं आवश्‍यक आहे. मात्र, यासाठी आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये उपाय नव्हे तर पळवाटा शोधण्यावरच चर्चा अधिक होते, हे ग्रेटाने निदर्शनास आणून दिलं. कितीही नाकारलं तरी ही वस्तुस्थिती आहे आणि शास्त्रज्ञांनी ती पुराव्यांनिशी मांडलीही आहे; परंतु झोपेचं सोंग घ्यायचं ठरवलं तर जागं कसं करणार? कौतुक वाटतं ग्रेटाचं! ज्यांना हवामान बदलांचे दुष्परिणाम सहन करायचेत, त्या पिढीची ती प्रतिनिधी, पण तिच्या वयातल्या मुलांना या संकटाची कितपत जाणीव आहे?

या पार्श्‍वभूमीवर, भारतातल्या मुलांविषयी नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणाची आकडेवारी खूप बोलकी आहे. आपल्या देशात सुमारे चाळीस लाख मुलं अमली पदार्थांच्या व्यसनात गुरफटली आहेत, तर तीस लाख मुलांना दारूचं व्यसन आहे, अशी धक्‍कादायक माहिती समोर आलीय. हे कुठल्याही स्वयंसेवी संस्थेचं सर्वेक्षण नाहीये. खुद्द सरकारने लोकसभेत दिलेली ही माहिती आहे. “फर्स्ट टाइम व्होटर्स’ म्हणून निवडणूक काळात डोक्‍यावर घेतल्या जाणाऱ्या पिढीला “भूल’च अशी की “दिशाभूल’ समजूच नये!

Leave A Reply

Your email address will not be published.