मतदानोत्तर चाचण्या विसरा; हरियाणात कॉंग्रेसचेच सरकार येईल

चंडीगढ : मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्‍झिट पोल्स) वर्तवलेले अंदाज विसरा. हरियाणात कॉंग्रेसच सरकार स्थापन करेल, असा विश्‍वास पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा कुमारी सेलजा यांनी मंगळवारी व्यक्त केला.

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले. ती प्रक्रिया झाल्यानंतर विविध मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. त्या चाचण्यांनी बहुमताचा आकडा आरामात पार करत भाजप हरियाणाची सत्ता राखणार असल्याचे भाकीत वर्तवले. मात्र, सेलजा यांनी येथे पत्रकारांशी बोलताना ते भाकीत फेटाळूून लावले.

विधानसभेच्या एकूण 90 पैकी 45 हून अधिक जागा जिंकत कॉंग्रेस बाजी मारेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. विजयाबद्दल एवढा विश्‍वास कशामुळे वाटतो, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्या उत्तरल्या, कॉंग्रेसच्या उमेदवारांकडून मतदानानंतर मिळालेला फिडबॅक उत्साहवर्धक आहे. त्याशिवाय, भाजपने हरियाणातील जनतेशी निगडीत मुद्दे टाळले. त्या पक्षाने जनतेचे लक्ष राष्ट्रीय मुद्‌द्‌यांकडे वळवण्याचा प्रयत्न केला. त्यातून हरियाणातील भाजप सरकारचे अपयश अधोरेखित होते.

जनतेच्या ते ध्यानात आले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. पुढे बोलताना सेलजा यांनी इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) विश्‍वासार्हतेबाबत शंका उपस्थित केली. भाजपच्या एका उमेदवाराच्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडीओकडे त्यांनी अंगुलिनिर्देश केला. मतदारांनी कुठलेही बटण दाबले तरी मत भाजपलाच मिळणार असल्याचे तो उमेदवार म्हणत असल्याचे त्या व्हिडीओतून दिसले.

Leave A Reply

Your email address will not be published.