गाळप हंगाम संपत आला तरी गाळपाची माहिती उपलब्ध नाही
पुणे – गाळप हंगाम संपत आला तरी अद्याप साखर आयुक्तालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर मात्र गाळपाची माहिती अद्ययावत करण्यास आयुक्तालयाला यश आलेले नाही. त्याचबरोबर आता गाळपाच्या तारखासुद्धा चुकीच्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहे.
राज्यात गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर दरवर्षी साखर आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर रोजच्या गाळपाची माहिती प्रसिद्ध केली जाते. राज्यातील सर्व कारखान्यांकडून माहिती गोळा करून हा डेटा संकेतस्थळावर टाकला जातो. ही पद्धत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, यंदाच्या गाळप हंगामात संकेतस्थळावर ही आकडेवारी अद्याप पाहायला मिळालेली नाही.
राज्यातील सर्व कारखान्यांची माहिती अपलोड करून ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणाऱ्या अधिकऱ्यांची बदली झाली असल्याने ही आकडेवारी अपलोड होत नसल्याचे साखर आयुक्तालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. याशिवाय संकेतस्थळावर एका वाक्यात आज किती उसाचे गाळप झाले अणि साखरेचे उत्पादन झाले याची माहिती दिली जाते. ही माहितीसुद्धा चुकीची आहे. या ठिकाणी देण्यात आलेली तारीख ही 4 मे 2019 मधील आहे. हा आकडा गेल्यावर्षीचा आहे, तोही चुकीचा आहे.