अमेरिकेचे 47 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दुसर्यांदा शपथ घेतली. त्यांची पहिली टर्म बर्यापैकी वादग्रस्त ठरली होती. विशेषतः ती भारतासाठी आव्हानात्मक ठरली होती. त्यामुळे आता या दुसर्या टर्ममध्ये त्यांचा भारताच्या बाबतीत रवैया काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांच्या पहिल्या टर्मनंतर ते पुन्हा दुसर्यांदा निवडणुकीला उभे राहिले होते; परंतु अनपेक्षितपणे त्यांना पराभवाला तोंड द्यावे लागले होते. त्यावेळी ट्रम्प यांनी सत्ता सोडण्यास जवळपास नकारच दिला होता. त्यामुळे राजधानी वॉशिंग्टनमध्ये अभूतपूर्व पेचप्रसंग उद्भवल्याचे जगाने पाहिले होते. आपल्या समर्थकांना राजधानीत जमवून त्यांनी जो धुडगूस घातला होता तो आश्चर्यकारक होता. त्याविषयी त्यांच्या विरोधात एक खटला दाखल झाला होता. त्याच्याही आधी अनेक खटले त्यांच्या विरोधात दाखल आहेत. त्यात लैंगिक शोषणाच्या आरोपाचेही खटले आहेत.
अगदी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्याच्या आधी अशाच एका खटल्यात ट्रम्प यांना दोषी मानले गेले होते. पण केवळ आता ते राष्ट्राध्यक्ष होणार आहेत म्हणून त्यांना तद्अनुषंगिक शिक्षा दिली गेली नाही. सांगायचा मुद्दा हा की हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे. पण अर्थातच तितकेच ते लोकप्रियही आहेत, म्हणूनच त्यांना तेथील जनतेने दुसरी टर्म बहाल केली आहे. या आपल्या दुसर्या कारकिर्दीचा अजेंडा ट्रम्प यांनी याआधीच जाहीर केला आहे. अध्यक्ष झाल्या झाल्या आपण शंभर प्रशासकीय अध्यादेश जारी करीत आहोत, असे नमूद करून त्यांनी आपला आक्रमक इरादा स्पष्ट केला आहे. मेक्सिको सीमा सील करणे, अमेरिकेत राहणार्या अवैध नागरिकांना हाकलून देणे, अमेरिकेच्या भूभागाखाली जे इंधन किंवा तेल आहे त्याचा शोध घेऊन त्याबाबतीत अमेरिकेला स्वयंपूर्ण करणे असे आपले इरादे त्यांनी घोषित केले आहेत. त्यांना आपल्या कारकिर्दीत विस्तारवादी चीनचा मुकाबला करायचा आहे.
हा मुकाबला ते कसे करणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. पण या पार्श्वभूमीवर त्यांनी चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांना शपथविधीचे निमंत्रण दिले होते, पण जिनपिंग यांनीच ते नाकारले. या शपथविधीला त्यांनी हंगेरी, इटली वगैरे त्यांच्या मित्र देशांच्या राष्ट्रप्रमुखांना निमंत्रण दिले होते. त्यांनी अपवाद फक्त नरेंद्र मोदी यांचा केला आहे. नरेंद्र मोदी यांना या शपथविधीचे निमंत्रणच दिले गेले नाही. याविषयी अनेक बातम्या मीडिया रिपोर्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. ट्रम्प यांनी आपल्याला निमंत्रण द्यावे असा आग्रह धरण्यासाठी मोदी यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना अमेरिकेला पाठवले होते असे म्हणतात. अमेरिकेतील विविध पातळीवरील लोकांशी जयशंकर यांनी चर्चा करून मोदींना निमंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला; पण तो अमान्य झाला.
पण ट्रम्प यांनी मोदी यांच्याऐवजी जयशंकर यांनाच शपथविधीला आमंत्रित केले, त्यानुसार एस. जयशंकर तेथे उपस्थित होते. जयशंकर यांच्याखेरीज भारतातील मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनासुद्धा या शपथविधीचे निमंत्रण होते. पण मोदी यांना ते नव्हते याचे वेगवेगळे अर्थ सध्या काढले जात आहेत. याचा एक सरळ आणि थेट अर्थ असा निघतो की, ट्रम्प यांना भारताशी संबंध हवे आहेत, पण मोदी वगळून भारत त्यांना हवा आहे. मोदी हे ट्रम्प यांचे मित्र मानले जात होते; परंतु वस्तुस्थिती तशी नव्हती असे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. अमेरिकेतील निवडणूक प्रचाराच्या काळात नरेंद्र मोदी हे अध्यक्षीय निवडणुकीतील दुसर्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या बाजूला झुकले होते. त्या निवडणूक काळात मोदी यांचा जेव्हा अमेरिका दौरा झाला त्यावेळी ट्रम्प यांनी भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोदी यांना निमंत्रण दिले होते; पण मोदी यांनी ते नाकारले होते, तो राग ट्रम्प यांनी मनात धरला असावा, असा निष्कर्ष काही मीडिया रिपोर्टमध्ये आहे.
ट्रम्प भारतासाठी अनाठाई उदारमतवादी भूमिका घेतील असे मानता येणार नाही. उलट चित्रच आता असे दिसले आहे की, अमेरिकेच्या इच्छेला आता भारताने स्वतःहून मान देऊन अमेरिकेबरोबरचा सलोखा कायम राहील असा प्रयत्न सुरू केला आहे. मागच्याच आठवड्यात अमेरिकेने रशियातील तेल उत्पादक कंपन्या आणि तेलाची वाहतूक करणारी जहाजे यांच्यावर निर्बंध जारी केले. हे निर्बंध भारत सरकारने त्वरेने मान्य केले आहेत. याद्वारे सांकेतिक रीतीने भारताने ट्रम्प प्रशासनाबरोबर मदतीचा हात पुढे केला आहे, आता तो हात स्वीकारायचा की झुगारायचा हे ट्रम्प यांच्या लहरी स्वभावावर अवलंबून असेल. भारताच्या दृष्टीने एका आणखीन महत्त्वाच्या निर्णयावर भारतातील युवा पिढीचे भवितव्य अवलंबून असेल. हा निर्णय म्हणजे एचवनबी व्हिसाबाबत ट्रम्प महाशय काय निर्णय घेतात हा आहे.
त्यांना बाहेरचे लोक अमेरिकेत येऊन सेटल होतात आणि येथील नागरिकांवर अन्याय होतो याचा खूप राग आहे. त्यामुळे ते एचवनबी व्हिसावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लागू करतील अशी आशंका व्यक्त केली जात आहे. पण ट्रम्प यांचे आवडते उद्योगपती एलन मस्क यांनी मात्र अशा निर्णयाला सक्त विरोध दर्शवला आहे. ट्रम्प यांनी असा निर्णय घेतला तर आपण त्यांच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले आहे. एचवनबी व्हिसा भारतीयांना नाकारणे म्हणजे अमेरिकेने स्वतःच्या पायावरच कुर्हाड मारून घेण्यासारखे होईल असे एलन मस्क यांचे म्हणणे आहे.
भारतीय तरुणांवर याबाबतीत टांगती तलवार आहे हे मात्र निश्चित. अमेरिका स्वतःचे पैसे खर्च करून जगाची धुणी धुणार नाही अशी ट्रम्प यांची पहिल्यापासूनची भूमिका आहे. त्यामुळेच त्यांनी जागतिक पर्यावरण रक्षणासाठीच्या पॅरिस करारामधूनही बाहेर पडण्याची भूमिका घेतली होती. मानवतेच्या दृष्टिकोनातून अमेरिकेने जगभर संयुक्त राष्ट्रमार्फत ज्या मोहिमा सुरू केल्या आहेत त्याचा निधी पुरवठाही ट्रम्प महाशय रोखू शकतात.