विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक पराभवानंतर एकीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये कुरबुरी आणि वाद सुरू असताना आणि जाणीवपूर्वक स्वबळाची भाषा बोलली जात असतानाच दुसरीकडे सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांनी मात्र आपापल्या पातळीवर आपल्या पक्षाची वाटचाल मजबूत करण्याकडे लक्ष केंद्रित केलेले दिसते. महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाचे राज्य अधिवेशन गेल्या आठवड्यात शिर्डी येथे पार पडले. त्यानंतर दोनच दिवसांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशनही शिर्डी येथेच झाले. महायुतीतील तिसरा घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेसुद्धा पुढील आठवड्यापासून राज्यभर आभार प्रदर्शन दौरा काढण्याचे नियोजन केले आहे. म्हणजेच महायुतीमध्ये राहूनसुद्धा आपापला पक्ष वाढवण्यासाठी या पक्षांनी आपली वाटचाल चालू ठेवली आहे. त्या दिशेने रणनीती आखण्यास प्रारंभ केला आहे.
भाजपाने शिर्डी येथे झालेल्या अधिवेशनामध्ये स्पष्टपणे शतप्रतिशत भाजपाचा नारा पुन्हा एकदा दिला. कोणत्याही पक्षाची मदत न घेता भाजपाला स्वबळावर सरकार हवे आहे हे लपून राहिलेले नाही. अमित शहा यांनी यापूर्वीही अनेकवेळा बोलून दाखवले आहे. शिर्डी येथील अधिवेशनामध्येही अमित शहा यांनी स्पष्टपणे तसेच संकेत दिले. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अधिवेशन झाले त्या अधिवेशनाचे नामकरण ‘अजित पर्व’ असे करण्यात आले. अधिवेशनाला छगन भुजबळ जरी उपस्थित असले तरी त्यांनी स्पष्टपणे अजित पवार यांच्यावर टीका करून आपली नाराजीही प्रदर्शित केली. राष्ट्रवादी काँग्रेसची आगामी वाटचाल जर ‘अजित पर्व’ या नावाखाली होणार असेल तर यापुढे या पक्षामध्ये कोणतीही चर्चा होणार नाही आणि चर्चा न करताच निर्णय होणार असे संकेत मिळत असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे म्हटले.
अर्थात, भुजबळ या अधिवेशनाला उपस्थित राहिले हेच पक्षासाठी महत्त्वाचे. एकनाथ शिंदे यांनी आगामी आठवड्यापासून जो राज्यव्यापी आभार प्रदर्शन दौरा सुरू करण्याचे नियोजन केले आहे त्यामागे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे संघटन अधिक कमजोर करणे हाच एकमेव हेतू आहे. दीड महिन्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून ठिकठिकाणी शिवसेनेच्या शाखा पातळीवरील संघटन मजबूत करणे याच एका हेतूने एकनाथ शिंदे यांनी या आभार दौर्याचे नियोजन केले आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस किंवा शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांनी या पराभावातून सावरून नव्याने पक्ष संघटनेची उभारणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नसतानाच विजय मिळाल्यानंतरही महायुतीतील घटक पक्षांनी ज्या प्रकारे वाटचाल चालू ठेवली आहे त्याचा विचार आता महाविकास आघाडीलाही करावा लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीत जरी चांगले यश मिळाले असले तरी जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तसेच यश मिळत नाही तोपर्यंत तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचता येणार नाही. याची जाणीव असल्याने महायुतीच्या घटक पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवूनच आपली ही वाटचाल सुरू केली आहे. भाजपासाठी राज्यामध्ये काँग्रेस किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना यांच्याशीच लढाई असली तरी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मात्र आपला पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मूळ पक्ष संघटन कमजोर करण्याकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून या सर्व घडामोडी केल्या जात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात या सर्व पक्षांची आपापली पॉकेट्स आहेत.
ही सर्व पॉकेट त्या त्या पक्षांसाठी कम्फर्ट झोन असली तरी इतर काही क्षेत्रांमध्येसुद्धा आपला प्रभाव वाढल्याशिवाय पक्ष अधिक मजबूत होणार नाही याची जाणीव असल्यानेच महायुतीच्या घटक पक्षांनी ही वाटचाल सुरू ठेवली आहे. भाजपाने पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपली मुळे बळकट करण्यास प्रारंभ केला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना विदर्भ आणि मराठवाडा या प्रदेशांमध्ये आपल्या पक्षाचा प्रभाव वाढण्याचे आव्हान पेलावे लागणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘अजित पर्व’च्या माध्यमातून झालेले नियोजन असो किंवा एकनाथ शिंदे यांचा राज्यव्यापी आभार दौरा असो त्यामागे इतर क्षेत्रांमध्ये आपल्या पक्षाचा प्रभाव वाढवणे हा हेतू आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिथिल राहिले आणि त्याचा फटका त्यांना विधानसभा निवडणुकीत बसला.
साहजिकच विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर अशा प्रकारचे शैथिल्य दाखवण्याची चूक करण्याची तयारी महायुतीच्या घटक पक्षांची नाही हेच यावरून सिद्ध होते. संपूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने मैदानात उतरले तरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचेही मैदान मारता येईल, याची जाणीव महायुतीला असल्याने हे सर्व नियोजन केले जात आहे. एखादी निवडणूक असो अथवा नसो नेहमी निवडणुकीच्याच मोडमध्ये राहणार्या भाजपाकडून आता इतर पक्षांनीही धडा घेतला असल्याने अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही आपापले पक्ष बळकट करण्याकडे लक्ष दिले आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष या रणनीतीला कशा प्रकारचे उत्तर देतात हे आता पहावे लागणार आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून महाविकास आघाडीला आपल्यातले मतभेद प्राधान्याने संपवावे लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विक्रमी विजयानंतरही महायुती अलर्ट मोडवर आहे याची दखल महाविकास आघाडीला घ्यावीच लागणार आहे.