अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी सत्तेवरून जाता जाता एक वादग्रस्त निर्णय घेतला. आपल्या अधिकारांचा वापर करत मुलाचे गुन्हे माफ केले. त्यामुळे बायडेन पुत्र हंटर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे आता संपुष्टात आले आहेत. काही काळापूर्वी याच बायडेन यांनी सिंहगर्जना केली होती की मुलाची शिक्षा आपण माफ करणार नाही किंवा कमीही करणार नाही. मात्र, त्यांनी घुमजाव केले आणि माफी देण्याचा निर्णय घेतला. बायडेन यांच्या निर्णयामुळे जगात देश कोणताही असो आणि तेथील राज्यपद्धती कोणतीही असो पिता हा जेव्हा वेळ येते तेव्हा पिताच होतो आणि राज्यकर्ते जेव्हा आपल्या हिताचा विचार येतो तेव्हा राष्ट्रापेक्षा कुटुंबालाच झुकते माप देतात हे पुन्हा सिद्ध झाले. बायडेन यांच्या निर्णयावर अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्थातच टीका केली आहे.
अध्यक्षांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अध्यक्षांना माफीचा अधिकार असावा का, यावर आता अमेरिकेत वाद सुरू झाला आहे. वास्तविक बराक ओबामा यांचे बायडेन उत्तराधिकारी. ओबामांची कारकीर्द चमकदार होती अन् खुद्द बायडेन यांनी त्यांचे डेप्युटी म्हणून काम केले असल्यामुळे अमेरिकेला त्यांच्याकडून बर्याच अपेक्षा होत्या. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही व बायडेन यांची एकूणच राजवट अमेरिका पेंगुळलेल्या अवस्थेत होती अशा धाटणीची राहिली. अनेक विवादांचा त्यांना सामना करावा लागला व त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे वय आणि त्यापरत्वे त्यांना आलेली दुखणी आणि त्यांचे मानसिक आरोग्य.
कायमच अमेरिकी माध्यमांतून याविषयी चर्चा झाली. एवढे असूनही बायडेन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून मागे हटण्यास तयार नव्हते. पहिल्याच डिबेटमध्ये आक्रमक डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची लक्तरे काढल्यावर बायडेन यांचे स्वपक्षीयच भानावर आले आणि त्यांनी बायडेन यांनी निरोप घेण्याचा दबाव पडद्यामागून त्यांच्यावर आणला. आता अध्यक्षपदाचा त्यांचा कार्यकाळ जेमतेम महिनाभराचा उरला आहे. त्यातच ते वादग्रस्त आणि जगात अशांतता माजवतील असे निर्णय घेत आहेत. हंटर बायडेन यांना माफी देण्याच्या अगोदर त्यांनी रशिया-युक्रेन युद्धात तेल ओतण्याचे काम करेल असा निर्णय घेतला. युक्रेनला अमेरिका आणि ब्रिटन आदी देशांनी जी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे दिली होती त्याचा वापर करण्यावर अगोदर बंधन घालण्यात आले होते.
ते काही दिवसांपूर्वी बायडेन यांनी हटवले आणि युक्रेनने काही तासांतच रशिया विरुद्ध या क्षेपणास्त्रांचा वापर केला. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धामुळे जगात अनिश्चिततेचे वातावरण आहे. अर्थकारणाला आणि वितरण साखळीलाही त्याचा जबर हादरा बसला आहे व मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. अशा स्थितीत सर्वशक्तिमान अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने बायडेन यांच्याकडून जबाबदारीचे वर्तन होण्याची अपेक्षा असताना त्यांनी युद्धाची धग आणखीनच वाढेल असा निवाडा करून काय साधले याची त्यांनाच कल्पना असावी. या निर्णयाविषयी जगभरातील माध्यमांमध्ये चर्चा असताना आता अमेरिकेतील माध्यमांना त्यांनी आपल्या हंटरमाफीच्या निर्णयामुळे खाद्य पुरवले.
चीन या अमेरिकेचे सख्य नसलेल्या राष्ट्राशी व्यापारी स्वरूपाची देवाणघेवाण, करचोरी आणि मनी लाँडरिंग, बंदूक खरेदी आणि नशा करण्याची सवय असे अनेक गंभीर आरोप बायडेन पुत्रावर आहेत. त्यांना करचोरीच्या प्रकरणात 17 वर्षे तर शस्त्रखरेदी प्रकरणात 25 वर्षांची शिक्षा होऊ शकली असती. विशेष म्हणजे याच महिन्यात त्यांना शिक्षा सुनावली जाण्याची दाट शक्यता होती, जी आता संपुष्टात आली आहे. साधारण चार वर्षांपासून हंटर बायडेन यांच्या विरोधात या प्रकरणांची न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. त्यावर झालेला खर्च आणि झालेला वेळेचा अपव्यय हे दोन मुद्देही आता बायडेनविरोधी नाराजी वाढवण्याचे प्रमुख कारण ठरले आहेत. अमेरिकेच्या घटनेनुसार अध्यक्षांना शिक्षा माफ करण्याचा अधिकार आहे.
जगातील बहुतांश देशांत असे अधिकार सर्वोच्च पदावरील व्यक्तीला बहाल आहेत. ब्रिटनमध्ये राजाला तो अधिकार आहे व त्यावरून अमेरिकेतही संविधानात त्याचा समावेश केला गेला असे म्हटले जाते. आपण न्याय विभागाच्या कामात हस्तक्षेप करणार नाही, असे जाहीरपणे सांगणार्या बायडेन यांनी अखेरच्या क्षणी निर्णय घेत अध्यक्षावर एका पित्याने मात केल्याचे सिद्ध केले आणि एकप्रकारे ते खोटे बोलले अशी भावना जर अमेरिकी नागरिकांची झाली असेल तर त्यांना दोष देता येत नाही. बरे बायडेन यांच्यानंतर जी व्यक्ती अमेरिकेची धुरा सांभाळणार आहे ते ट्रम्प अशा बाबतीत अत्यंत घातक आहेत. त्यांनी या माफीला वेगळेच वळण दिले आहे.
मागच्या टर्ममध्ये ट्रम्प जेव्हा पराभूत झाले होते तेव्हा त्यांनी सत्तांतराच्या वेळी अमेरिकेत अभूतपूर्व असे संभ्रमाचे वातावरण तयार केले होते. त्यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेतच धुडगूस घातला होता. त्या प्रकरणात जे लोक कैदेत आहेत त्यांनाही माफी दिली पाहिजे, असे ट्रम्प यांनी आता आडवळणाने सांगितले आहे. याचा अर्थ अध्यक्षपदाची सूत्रे अधिकृतपणे हातात घेतल्यानंतर ट्रम्प त्या कैद्यांची सुटका करणारच नाहीत याची खात्री आज कोणी देऊ शकत नाही. माझ्या मुलाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात होते.
एक पिता आणि अध्यक्ष म्हणून मी हा निर्णय का घेतला हे अमेरिकेचे लोक समजून घेतील अशी अपेक्षा बायडेन यांनी भावूकपणे व्यक्त केली आहे. ट्रम्पही अमेरिका फर्स्ट, अमेरिकेची सुरक्षा, देशप्रेम, राष्ट्रवाद आदी शब्द आक्रमकपणे वापरून आपल्या समर्थकांची सुटका करणारच नाहीत कशावरून? मोठ्या पदावर असणार्या व्यक्तींना चूक करण्याचा अधिकार नसतो. त्यांच्या चुका दीर्घकाळात मोठ्या संकटाची मालिका निर्माण करतात हाच यातून घेण्याचा अर्थ.