अग्रलेख : चर्चेतील कलमाचा अडथळा

मणिपूरच्या घटनांचे संसदेत पडसाद उमटणे अगदीच स्वाभाविक आहे. त्यानुसार संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून हा मुद्दा तापलेला आहे. सरकार नुसत्याच घोषणा करीत आले आहे की, कोणत्याही प्रश्नांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. अगदी मणिपूरच्या विषयावरही सरकारची चर्चा करण्याची तयारी आहे. पण सरकारला ही चर्चा केवळ कामकाज नियमावलीच्या कलम 171 अन्वये अल्पावधीच्या कालावधीसाठी हवी आहे आणि विरोधकांना मात्र ही चर्चा वेळेचे कोणतेही बंधन नसलेल्या कलम 267 अंतर्गत चर्चा हवी आहे. त्यावरून सध्या दोन्ही बाजूंकडून घमासान सुरू आहे. यापूर्वीही अनेक वेळा कोणत्या कलमांन्वये चर्चा करायची यातून संसदेत गदारोळ झाले आणि संसदेच्या कामकाजाचे पूर्ण सत्रच वाया गेल्याचा प्रकार देशाने अनुभवला आहे. याहीवेळी तोच घोळ सुरू आहे. वास्तविक सरकार चर्चा करायला राजी असेल तर ती कोणत्याही कलमान्वये झाली तर त्यांना काही फरक पडण्याचे कारण नाही.
अगदी कलम 267 अन्वये मणिपूरवर दीर्घकालीन चर्चा झाली तरी सरकारने त्याला सामोरे जायला हवे, पण सरकार त्यावर राजी नाही. या कलमात मतदान घ्यायचीही तरतूद आहे. मणिपूरवरून मतदान झाले तरी लोकसभेत सरकारला काही अडचण येण्याची शक्यता नाही. कारण, सरकारला पूर्ण बहुमत आहे. राज्यसभेत त्यांची यावरून थोडी गोची होण्याची शक्यता आहे. कारण त्यांना राज्यसभेत बहुमत नाही. त्यासाठी अन्य पक्षांची मनधरणी करण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते. म्हणून सरकार कलम 267 अन्वये चर्चा घेण्यास टाळाटाळ करीत असावे. पण यातूनही त्यांना मार्ग काढता येणे सहज शक्य आहे. लोकसभेत त्यांना स्वबळावर बहुमत असल्याने त्यांनी लोकसभेत कलम 267 अन्वये चर्चा करण्याची तयारी दर्शवावी मग कदाचित राज्यसभेत अल्पकालीन चर्चेला विरोधकही राजी होतील.
पण सरकारला मणिपूरच्या नावडत्या विषयावर दीर्घकालीन चर्चा संसदेच्या कोणत्याच सभागृहात नको आहे. एकदा ही चर्चा करण्यास अनुमती दिली गेली तर एकवटलेला विरोधक सरकारचे वाभाडे काढू शकतो अशी त्यांना भीती वाटत असावी. हे अंतस्थ कारण असताना आम्ही कोणत्याही विषयावर चर्चेला तयार आहोत अशा भूमिकेचे तुणतुणे सारखे वाजवत ठेवून त्यांनी देशाची दिशाभूल करता कामा नये. लोक आता जागृत आहेत. सरकार मणिपूरवर दीर्घकालीन चर्चा टाळत आहे, हे लोकांच्या एव्हाना लक्षात आले आहे. त्यामुळे या विषयावर आता तोडगा निघेल की हेही अधिवेशन कोणत्याही कामकाजाशिवाय वाया जाईल, हे पाहावे लागेल. तसेही सरकारला संसदीय कामकाजात फार स्वारस्य असल्याचे कधी दिसले नाही. गोंधळामुळे कामकाज वाया जाणे सरकारच्याच पथ्यावर पडत असल्याने विरोधकांकडून होणारा गोंधळ सरकार बिनधास्त चालू देते हेही अनेक वेळा अनुभवाला आले आहे.
संसदेचे कामकाज सुरळीत सुरू ठेवणे आणि तेथे अधिकाधिक वेळ चर्चेला उपलब्ध करून देणे ही सरकारचीच प्राथमिक जबाबदारी आहे. पण सरकारला ती जबाबदारी पार पाडण्यातही फार स्वारस्य नाही. मणिपूरच्या घटनेवरून भारताची संपूर्ण जगात चांगलीच शोभा झाली आहे. युरोपियन युनियनच्या संसदेत मणिपूरच्या विषयावर चर्चा होते, तेथे या घटनांमुळे चिंता व्यक्त करणारा ठराव होतो. पण भारतीय संसदेत मात्र कोणत्या कलमाखाली ही चर्चा घ्यायची हेच अजून ठरत नाही आणि त्यामुळे या विषयावर अजून भारतीय संसदेत चर्चाच होताना दिसत नाही. आंतरराष्ट्रीय मीडियानेही मणिपूरचा हिंसाचार आणि तेथे महिलांवर करण्यात आलेल्या सामूहिक अत्याचाराच्या विषयाला फार महत्त्व दिले आहे. त्यातूनही देशाची मानहानी होत आहे. पण त्याची फिकीर नेमकी कोणी करायची हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. विरोधकांनी मणिपूरचा विषय लावून धरल्यानंतर सत्ताधारी पक्षाने बिहार, राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसक घटनांचा विषय लावून धरला आहे.
विरोधकांनी मणिपूरच्या विषयावर संसदेच्या आवारात निदर्शने केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधारी पक्षानेही राजस्थानातील महिलांच्या वाढत्या अत्याचाराच्या विषयावर संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्यावर आज निदर्शने केली. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर दोन्ही बाजूंकडून केवळ राजकारणच सुरू असल्याचा विदारक अनुभव देशवासीयांना येत आहे. यातील महत्त्वाचा भाग असा आहे की मणिपूरमधे काढण्यात आलेली महिलांची नग्न धिंड हा अत्यंत गंभीर विषय 77 दिवसांनी जगापुढे आल्यानंतर त्यावर संवेदनशीलतेने सरकारने किमान खुली चर्चा तरी होऊ द्यायला हवी होती. पण सरकार अजून त्याला राजी नाही. यातून महिलांच्या संरक्षणाची ग्वाही देऊन सत्तेवर आलेल्या सरकारचीच मानहानी अधिक प्रमाणात होताना दिसत आहे. पण त्याचीही फिकीर हे सरकार करताना दिसत नाही ते अधिक वेदनादायी आहे. या साऱ्या घटनाक्रमांवर पंतप्रधान मोदी सुरुवातीपासूनच मौन बाळगून आहेत. मणिपूरच्या विषयावर 77 दिवसांनी त्यांनी तोंड किंचित उघडले, पण त्यातही त्यांनी राजस्थान आणि छत्तीसगडच्या कॉंग्रेस सरकारांना घेरून तिथेही राजकारणच केले आहे.
नग्न व्हिडिओच्या प्रकरणात तुम्ही स्वतःहून कारवाई करा अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल, असा सज्जड इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरच मोदींना मणिपूरविषयी काही तरी तोंड उघडणे भाग पडले. मोदी संसदेच्या कोणत्याच सभागृहात सध्या उपस्थित राहात नसल्याचे दिसून आल्याने, “प्रधानमंत्री सदन में आओ’, अशा घोषणा करीत विरोधकांना संसदेच्या बाहेर आंदोलन करावे लागले आहे. मणिपूर घटनांवर पंतप्रधानांनी संसदेत येऊन विस्तृत निवेदन करावे अशी देशाची आणि विरोधकांची किमान अपेक्षा आहे. पण ही अपेक्षाही ते पूर्ण करताना दिसत नाहीत हेही दु:खद आहे. पंतप्रधान रशिया-युक्रेनचे युद्ध थांबवतात असा प्रचार सरकारी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. पण मग आपल्याच देशातील एका राज्यातील काही समुदायांमध्ये सुरू असलेले द्वंद्व ते का थांबवू शकत नाहीत, असा रास्त प्रश्न विरोधक विचारत आहेत.
मोदींना अमेरिका, फ्रान्स आणि सौदी अरेबियात जायला वेळ आहे पण ते मणिपूरला एकदाही का जाऊ शकत नाहीत, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. निदानपक्षी मणिपुरात शांतता राखा असे तोंडदेखले आवाहनसुद्धा पंतप्रधान या नात्याने मोदींना का करता येत नसेल, हाही प्रश्न लोकांच्या मनात आहे. सरकारची ही सारी भूमिका लक्षात घेतली तर मणिपुरात जे काही चालले आहे ते तसे घडणे सरकारला अपेक्षितच आहे काय, असाही संशय निर्माण होतो. तो संशय त्यांनीच दूर करायला हवा.





