महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यातही उत्तर महाराष्ट्रातील राजकारणातील एक प्रभावशाली नेते एकनाथ खडसे यांच्या सध्याच्या राजकीय वाटचालीबाबत निश्चितच संभ्रम निर्माण झाला आहे. कित्येक वर्षे भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या आणि या पक्षाला महाराष्ट्रात वाढवण्यासाठी महत्त्वाची कामगिरी केलेल्या एकनाथ खडसे यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये आपण प्रवेश करत असल्याचे जाहीर केले होते. पण अद्यापही एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा करण्यात आली नसल्याने खडसे नाराजही आहेत आणि अस्वस्थही आहेत. पुन्हा एकदा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यांची पावले वळू लागली आहेत. भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी भेट झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपण भाजपामध्ये आलो असल्याची जाहीर घोषणा केली होती. पण महाराष्ट्राच्या पातळीवर एकनाथ खडसे यांना पक्षामध्ये सहभागी करून घेण्यासाठी कोणताही कार्यक्रम झाला नाही. खडसे आमच्यासोबत आहेतच अशा प्रकारची वक्तव्य करण्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मंत्रिपद सोडावे लागले होते. त्यानंतरच खडसे आणि फडणवीस यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झाले. त्यातच देवेंद्र फडणवीस यांचा उजवा हात असलेले गिरीश महाजन हेसुद्धा जळगाव जिल्ह्यातील प्रभावशाली राजकीय व्यक्तिमत्त्व असल्याने त्या जिल्ह्यामध्येसुद्धा एकनाथ खडसे यांची राजकीय कोंडी करण्याचे काम महाजन यांनी केले होते. एकनाथ खडसे यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार राज्यात होते. तेव्हा गृहमंत्री पदावर असलेल्या अनिल देशमुख यांना सांगून खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा कट रचला होता, अशा प्रकारचा आरोपही महाजन यांनी केला. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे महाराष्ट्रातील प्रभावशाली नेते असल्याने भाजपातील आपल्या प्रवेशाला त्यांचा अडसर ठरत असल्याचे एकनाथ खडसे यांनी अनेक वेळा जाहीर केले. केंद्रातील नेत्यांपेक्षाही फडणवीस आणि महाजन मोठे नेते असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी मारला. दीर्घकाळ राजकारणात असलेल्या एकनाथ खडसे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याची ही राजकीय मनस्थिती निश्चित समजून घेण्यासारखी आहे.
भाजपच्या स्थापनेपासून या पक्षासोबत असणार्या एकनाथ खडसे यांनी केवळ राजकीय अपरिहार्यतेतून हा पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांची नाळ मुळातच भारतीय जनता पक्षासोबत जोडली गेली आहे. उत्तर महाराष्ट्रात आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येसुद्धा पक्षवाढीचे काम करण्यामध्ये एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा होता. पण पक्षाने आपल्या या कामगिरीची योग्य दखल कधीच घेतली नसल्याची त्यांची तक्रार कायम होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या कालावधीत एकनाथ खडसे यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा आपल्याला फडणवीस यांच्याकडून राजकीय संरक्षण मिळेल असे खडसे यांना वाटत होते; पण तसे झाले नाही. दुसरीकडे त्यांच्या जळगाव जिल्ह्याच्या पातळीवरही त्यांना गिरीश महाजन यांचा राजकीय विरोध कायमच राहिला. अशी सर्व परिस्थिती असताना एकनाथ खडसे यांची सध्याची अवस्था ‘एकटा’ अशीच झाली आहे. कारण एकतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवरून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये जात असल्याचे जाहीर केले;
पण भाजपने मात्र अधिकृतपणे अद्याप खडसे यांना पक्षात घेतलेले नाही. साहजिकच हा राजकीय गोंधळ संपवण्याचे काम स्वतः एकनाथ खडसेच करू शकतात आणि त्या दिशेने त्यांच्या हालचाली होत असल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार जाऊन त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे सरकार येणे योग्य ठरेल, अशा प्रकारची जी इच्छा त्यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी व्यक्त केली त्यातून त्यांची ही राजकीय भूमिका स्पष्ट होते. खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा योग्य सन्मान राखून जर पक्षात प्रवेश झाला नाही तर ते कोणत्याही क्षणी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ शकतात हे उघड आहे. भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना याची कल्पना नसेल असे नाही; पण अंतर्गत राजकारणामुळेच या सगळ्या गोष्टी घडत आहेत. विद्यमान केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी म्हटल्याप्रमाणे एकनाथ खडसे जर भाजपमध्ये आले तर त्याचा उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपाला फायदाच होणार आहे.
पण याची कोणतीही जाणीव देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन या नेत्यांना आहे असे दिसत नाही. साहजिकच केंद्रातील नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा जे. पी. नड्डा या नेत्यांनी दबाव आणला तरच आता एकनाथ खडसे अधिकृतपणे भाजपमध्ये येऊ शकतील अन्यथा ते पुन्हा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन ही सर्व अनिश्चितता संपवून टाकतील. अर्थात एकनाथ खडसे यांच्याबाबत चालू असणारे हे राजकारण निश्चितच महाराष्ट्रातील पक्षांतर्गत राजकारणाचा एक नकारात्मक पैलू स्पष्ट करणारा आहे, हे नाकारून चालणार नाही.