राष्ट्रीय राजकारणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला छेद देण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला होता त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या आघाडीचे नेतृत्व स्वीकारणे आपल्याला आवडेल, अशा प्रकारचे संकेत नुकतेच दिल्यामुळे इंडिया आघाडीमध्ये आता वेगळ्या प्रकारचे राजकारण सुरू झाले आहे. ममता बॅनर्जी यांनी गेल्या आठवड्यामध्ये एका माध्यम समूहाला मुलाखत देत असताना इंडिया आघाडीच्या विद्यमान नेतृत्वाबद्दल अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करून गरज भासली, तर पश्चिम बंगालमध्ये राहून मी या आघाडीचे नेतृत्व करायला तयार आहे, असे स्पष्ट शब्दात सांगितले.
ममता बॅनर्जी यांच्या या विधानानंतर इंडिया आघाडीत खळबळ माजणे साहजिक होते. कारण सध्या इंडिया आघाडीचा सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या राहुल गांधी यांच्याकडे इंडिया आघाडीचे अघोषित नेतृत्व आहे. ते पाहता काँग्रेस पक्षाकडून प्रतिक्रिया येणे अपेक्षितच होते. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी अप्रत्यक्षपणे ममता बॅनर्जी यांच्या या विधानावर टीका केली असली, तरी शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी मात्र ममता बॅनर्जी आघाडीचे नेतृत्व करू शकतात, असे सूचक विधान केले आहे. समाजवादी पक्षाकडूनही ममता बॅनर्जी यांच्यासाठी हिरवा कंदील आहे.
आघाडीचा महत्त्वाचा घटक पक्ष असलेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचेही ममता बॅनर्जी यांच्याशी चांगले संबंध असल्याने त्यांचाही ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाला विरोध असणार नाही. मुळात 20 पेक्षा जास्त पक्षांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी जी आघाडी स्थापन केली होती त्या आघाडीने लोकसभा निवडणुकीमध्ये चांगले यश मिळवून नरेंद्र मोदी यांचा वारू रोखला होता. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. विशेषतः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर पुन्हा एकदा इंडिया आघाडीमध्ये या ताज्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने स्पष्टपणे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका घेतली आहे.
तर राष्ट्रीय स्तरावर केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीनेही दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांमध्ये अशा प्रकारचा अंतरविरोध असल्यामुळेच पुन्हा एकदा हा नेतृत्वाचा प्रश्न तयार झाला आहे. पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये ममता बॅनर्जी यांच्यासाठी डाव्या पक्षाइतकाच काँग्रेस हा राजकीय शत्रू आहे. पश्चिम बंगालवरील लक्ष अजिबात कमी होऊ न देता राष्ट्रीय राजकारणात लक्ष घालण्याचे संकेत ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. जेव्हा इंडिया आघाडीची स्थापना झाली तेव्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडीला एक सक्षम पर्याय निर्माण होईल असे वाटत असतानाच या घटक पक्षांमधील अंतरविरोधामुळे नवनवीन समस्या निर्माण होऊ लागल्या.
एकेकाळी या आघाडीचा घटक पक्ष असलेल्या नितीशकुमार यांनीसुद्धा आपण या आघाडीचे नेतृत्व करायला तयार आहोत असे संकेत दिले होते. त्यानंतर काही कालावधीतच ते या आघाडीतून बाहेर पडले आणि भाजपा आघाडीमध्ये सहभागी झाले. आता ममता बॅनर्जी यांनी या आघाडीचे नेतृत्व करण्याची तयारी दर्शवली आहे याचा निश्चित अर्थही लक्षात घेण्याची गरज आहे. आघाडीमधील विविध घटक पक्ष स्वतःचा पाया भक्कम करत असताना या आघाडीकडे एक सामूहिक पर्याय म्हणून त्याच क्षमतेने बघत नाही असेच ममता बॅनर्जी यांना सुचवायचे आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळवून त्यांनी जवळपास 100 जागा जिंकल्या असतील तर नैसर्गिकपणे या आघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडेच येते.
इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असूनही काँग्रेसने स्वतःचा पाया भक्कम करण्यावर भर दिला आणि इंडिया आघाडीतील इतर पक्ष कमकुवत झाले असाही एक समज निर्माण होत आहे. काँग्रेस हा प्रमुख राष्ट्रीय पक्ष असल्याने अनेक वर्षे प्रत्येक राज्यांमध्ये निवडणुका लढवताना तेथील प्रादेशिक पक्षाशी त्यांना संघर्ष करावा लागला आहे. आता एकेकाळचे विरोधक इंडिया आघाडीचे घटक पक्ष झाले असल्याने ही मोळी बांधताना काँग्रेसची कसरत होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाशीसुद्धा काँग्रेसने हात राखूनच मैत्री केली आहे, तर दिल्लीसारख्या राज्यामध्ये आम आदमी पक्ष हा काँग्रेसचा प्रमुख विरोधी पक्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या राजकीय विरोधक असलेल्या पक्षांचा पाया वाढवण्याचे काम काँग्रेस करेल अशी कोणतीही शक्यता नाही.
म्हणूनच आघाडीचे नेतृत्व करताना काँग्रेसच्या नेत्यांना काही मर्यादा येत आहेत असे ममता बॅनर्जी यांनी अप्रत्यक्षपणे सुचवले आहे. बंगालमध्ये काँग्रेस आणि डावे पक्ष यांचा अपवाद सोडता ममता बॅनर्जी यांची इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी थेट स्पर्धा नाही. म्हणूनच राष्ट्रीय पातळीवर भाजप आघाडीला जर भक्कम पर्याय निर्माण करायचा असेल तर सक्षम नेतृत्वाखालीच इंडिया आघाडी बळकट करावी लागेल असे ममता बॅनर्जी यांनी सुचवले आहे. लोकशाही निवडणूक प्रक्रियेतील निवडणुकीतील पराभवानंतर जसा एखादा पक्ष किंवा आघाडी विस्कळीत होते आणि विजयानंतर तीच आघाडी मजबूत होते तशाच प्रकारचे चित्र या निमित्ताने निर्माण झाले आहे. आगामी कालावधीत ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्याची तीव्रता आणखी किती वाढते हे पाहावे लागेल.