अग्रलेख : काळजी घेण्याचे दिवस

साधारणपणे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे चार महिने पावसाळी हंगामाचे मानण्यात येत असले, तरी गेल्या काही वर्षांमध्ये याचे वेळापत्रक बिघडून गेल्यामुळे आता पावसाळी हंगाम कधीही सुरू होतो आणि कधीही बंद होतो, असेच चित्र दिसते. यावर्षीही पावसाचा हंगाम उशिरा सुरू झाला आहे; पण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारे पावसाने रौद्ररूप धारण केले आहे ते पाहता आगामी दिवस निश्चितच काळजी घेण्याचे दिवस आहेत. ज्या प्रकारे गेल्या काही दिवसांमध्ये विविध प्रकारच्या नैसर्गिक घटना या पावसामुळे घडल्या आहेत ते पाहता आगामी कालावधीमध्ये अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सर्व स्तरावर काळजी घ्यावी लागणार आहे. सरकार पातळीवर विविध उपाययोजना राबवण्यात येत असल्या तरी वैयक्तिक पातळीवरही या कालावधीमध्ये काळजी घेऊन हानी होणार नाही हे पाहावे लागणार आहे. गेल्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. रस्ते वाहून गेले आहेत. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळे घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. अशा महापुराच्या घटना दरवर्षीच घडत असल्याने प्रशासनाने सर्व संबंधितांना याची पूर्वसूचना देऊनसुद्धा अनेक लोक आपले घर सोडण्यास तयार नसल्याने त्यांना अशा हानीसाठी सामोरे जावे लागते. कोणत्याही प्रकारची प्राणहानी किंवा वित्तहानी टाळायची असेल, तर प्रशासनाच्या सूचनांचे गांभीर्याने पालन करणे महत्त्वाचे आहे.
इर्शाळवाडी येथील दरड कोसळण्याच्या घटनेनंतर जरी अनेक लोकांचे ठिकठिकाणी पुनर्वसन करण्यात आले असले, तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांची पाठ वळताच अनेक लोक पुन्हा एकदा आपल्या मूळ ठिकाणी राहायला जाऊ लागले आहेत. अशा वर्तणुकीचा नंतर फटका बसू शकतो. आणखी एक गोष्ट म्हणजे पावसाळी हंगामासोबत पर्यटन हंगामही सुरू होतो. ठिकठिकाणी बहरलेली नैसर्गिक संपदा आणि वाहू लागलेले धबधबे हे अनेकांचे आकर्षण असते. या ठिकाणी अनेक लोक भेट देत असतात. पण या पर्यटनाच्या ठिकाणीसुद्धा काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये पर्यटनस्थळी अकारण आणि अनावश्यक धाडस दाखवल्यामुळे काही लोकांचा घसरून पडून मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय दिनदर्शिकेप्रमाणे सध्या अधिक महिना सुरू असल्यामुळे ठिकठिकाणी धार्मिक स्थळेसुद्धा पर्यटकांच्या आणि भक्तांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. सर्वसाधारणपणे अशी धार्मिक ठिकाणे ही पर्वतीय प्रदेशात किंवा दुर्गम ठिकाणी असतात. अशा ठिकाणी जाणेसुद्धा सध्याच्या पावसाळी हंगामात अवघड असते. त्यामुळे पावसाळी किंवा धार्मिक पर्यटन करत असतानासुद्धा योग्य काळजी घ्यावी. आणखी एक गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांत पडलेल्या तुफानी पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरांना पुराचा तडाखा बसला होता. घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली होती. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाले होते. अशा परिस्थितीमध्ये साथीचे रोग वाढण्याचीही भीती असते. या वर्षाच्या पावसाळी हंगामामध्ये जून महिना बऱ्यापैकी कोरडा गेला आणि जुलै महिन्याचा अर्धा भाग कोरडा गेला असला तरी नंतरच्या कालावधीत मात्र पावसाने आपली सरासरी भरून काढली आहे. ठराविक कालावधीमध्ये सर्वात जास्त पाऊस पडल्याने ही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
यावेळी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर ज्या ठिकाणी या कालावधीमध्ये पाऊस पडत नाही अशा दिल्ली, पंजाब या उत्तरेतील राज्यांनाही पावसाचा तडाखा बसला आहे. या राज्यांमध्ये सहसा परतीचा मान्सून हजेरी लावतो, पण या राज्यामध्येसुद्धा मान्सूनने लवकर हजेरी लावल्यामुळे तेथील प्रशासनाचीसुद्धा तारांबळ उडाली आहे. भारतीय हवामान खाते असो किंवा स्कायनेट, या दोन्ही संस्थांनी आगामी कालावधीमध्येसुद्धा भरपूर पाऊस पडणार असल्याचे अंदाज व्यक्त केले आहेत. आगामी आर्थिक वर्षातील सर्व घडी व्यवस्थित बसण्यासाठी अशा प्रकारचा पाऊस महत्त्वाचा असला, तरी योग्य वेळेमध्ये पाऊस पडला नाही आणि ठराविक कालावधीमध्ये तो थांबला नाही, तर तसे नुकसानही होते हे या ठिकाणी लक्षात घ्यावे लागेल. कारण, सध्या जरी मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असला तरी महाराष्ट्रासारख्या राज्यात अद्यापही पेरणीचे उद्दिष्ट पार पडलेले नाही. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या अद्यापही खोळंबल्या आहेत आणि ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे तेथील स्थिती बिकट झाल्यामुळे दुबार पेरणीचाही धोका आहे. राज्यातील प्रमुख धरणे जरी भरू लागले असले तरी त्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. पावसाळी हंगामामध्ये अशा प्रकारे सर्व नियोजन कोलमडून जाण्याच्या घटना यापूर्वी घडत असल्या तरी यावेळची परिस्थिती जरा वेगळीच आहे. साहजिकच सरकारलासुद्धा पुढाकार घेऊन विविध उपायांचा अवलंब करावा लागणार आहे.
केवळ गेल्या काही दिवसांत ज्या घटना घडल्या त्या आधारे हे नियोजन न करता आगामी कालावधीमध्ये काय होऊ शकते त्याचासुद्धा विचार करून हे नियोजन करावे लागणार आहे. दरडप्रवण क्षेत्रातील जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच काळजी घेऊन अनेक कुटुंबांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे हे चांगलेच आहे; पण जर अशा स्थलांतर प्रक्रियेला नागरिक प्रतिसाद देत नसतील, तर कारवाईचा धाकही दाखवावा लागणार आहे. पर्यटन करताना किंवा डोंगराळ भागात राहताना पावसामुळे कोणतीही दुर्घटना होणार नाही आणि चुकून अशी एखादी दुर्घटना झाली, तर हानी कमीत कमी होईल याची दक्षता आता सर्वच पातळीवर घ्यावी लागणार आहे. शासन आणि प्रशासन आपापल्या पातळीवर विविध प्रकारचे निर्णय घेऊन अंमलबजावणी करत असले तरी वैयक्तिक पातळीवर नागरिकांनीसुद्धा अशा निर्णयांना आणि सूचनांना प्रतिसाद देण्याची गरज आहे. कृषी अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळण्यासाठी आणि आगामी काळातील पाणीपुरवठ्याचे नियोजन व्यवस्थित व्हावे यासाठी पावसाळी हंगाम जरी महत्त्वाचा असला तरी त्याचवेळी तो धोकादायक आणि प्राणघातक होणार नाही याची काळजी सर्वांना वैयक्तिक पातळीवरच घ्यावी लागणार आहे. असाच संदेश गेल्या काही दिवसातील विविध घटनांनी दिला आहे.





