अग्रलेख : स्वबळाचे चिंतन

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जोरदार फटका बसल्यानंतर आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अर्थात, निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर आणि दारुण पराभव झाल्यानंतरही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्रितपणे अद्याप अधिकृत बैठक घेतलेली नाही. पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्रपणे बैठका घेऊन या पराभवाचे चिंतन केले आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बैठकीमध्ये बहुतांशी नेत्यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा सूर आळवला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याबरोबर निवडणूक लढवल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा तोटा झाल्याचे मत अनेक जणांनी व्यक्त केले. त्यामुळे आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशा प्रकारचे चिंतन या बैठकीत झाले. आता उद्धव ठाकरे निश्चित काय भूमिका घेतात हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची कारणमीमांसा करताना ईव्हीएम यंत्राला दोष देतानाच इतर अनेक महत्त्वाच्या कारणांकडे दुर्लक्ष होत आहे आणि त्यापैकीच एक महत्त्वाचे कारण हे एकत्र निवडणूक लढवणे हे असू शकते. याची जाणीव आता शिवसेनेच्या नेत्यांना झाली असावी.
या निवडणुकीमध्ये 90 च्या आसपास जागा लढवूनही उद्धव ठाकरे यांना फक्त 20 जागांवर यश मिळाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मात्र तब्बल 57 जागा जिंकल्या. म्हणजे शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी ज्या 56 जागा होत्या त्यापेक्षा एक जास्त जागा शिंदे यांनी जिंकली. शिवसेनेचा एकत्रित विचार करायचा झाला, तर तो आकडा 77 एवढा होतो. या आकडेवारीचा विचार करता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेत्यांनी स्वबळाचे चिंतन सुरू केले असावे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा महायुती आणि महाआघाडी या दोन्ही ठिकाणी फूट पडून जेव्हा भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती तेव्हा शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या होत्या.
निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपबरोबरच त्यांनी सरकार स्थापन केले होते. म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी एकदा स्वबळ आजमावून पाहिले आहे आणि त्याचा परिणामही त्यांना माहीत आहे. 2019 च्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या साथीने निवडणूक लढवल्यानंतर बहुमताचा आकडा मिळाल्यावरही उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यास नकार दिल्याने सर्वच गणिते बिघडून गेली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सहकार्याने ते मुख्यमंत्री झाले असले, तरी ते पद त्यांना टिकवता आले नाही. 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याबरोबरची मैत्रीही शिवसेनेला फलदायी ठरली नाही. तीन घटक पक्षांमध्ये सर्वात जास्त जागा शिवसेनेनेच जिंकल्या असल्याने अर्थात उद्धव ठाकरे यांचा स्ट्राइक रेट जास्त आहे.
भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आक्रमक हिंदुत्वाच्या जोरावर विधानसभा निवडणुकीत यश मिळवले असताना उद्धव ठाकरे यांनी मात्र तेवढ्या आक्रमकपणे आपल्या मूळ धोरणाचा प्रचार केला नाही. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याने त्यांच्यावर ही बंधने आलीच होती. साहजिकच ही बंधने आता तोडण्याची वेळ आली आहे, असे अनेक नेत्यांनी सुचवले असल्याने आगामी कालावधीमध्ये स्वबळाच्या चिंतनाचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आग्रहीपणे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी भूमिका घेतली होती.
पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी त्या भूमिकेला महत्त्व दिले नव्हते. साहजिकच अशा प्रकारचा चेहरा जर जाहीर केला असता, तर विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळा असू शकला असता अशी भावनाही उद्धव ठाकरे यांच्या मनात निर्माण झाली आहे. स्वबळावर जर निवडणूक लढवण्याची वेळ आली तर निवडणुकीचा चेहरा जाहीर करण्याबाबत कोणतेच मतभेद असणार नाहीत. या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने अनेक ठिकाणी शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा उमेदवारांचा प्रचार केलेला नाही. सोलापूरसारख्या ठिकाणी तर ऐनवेळी एका अपक्ष उमेदवाराला काँग्रेस पक्षाने ताकद दिली होती.
अशा अनेक गोष्टी समोर असल्याने शिवसेनेच्या नेत्यांकडून जर स्वबळाचा विचार केला जात असेल तर राजकीय अपरिहार्यता विचारात घ्यावी लागणार आहे. ईव्हीएमबाबत संशय व्यक्त करण्याचा एक मुद्दा सोडता या घटक पक्षांनी निवडणुकीच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी कोणताही पुढाकार घेतलेला नाही. काँग्रेस पक्षामध्येसुद्धा अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्याबाबत नाराजी आहे. उद्धव ठाकरे यांना बरोबर घेतल्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला फटका बसला अशी काही नेत्यांची भावना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. ज्याच्या जागा जास्त जिंकून येतील त्या पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळेल अशी भूमिका घेतली होती.
म्हणजेच काँग्रेस असो किंवा शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस असो या पक्षांनी उद्धव ठाकरे यांना जवळ करण्याची भूमिका नाईलाजाने घेतली होती. साहजिकच विधानसभा निवडणुकीच्या पराभवाची कारणे तपासताना शिवसेनेच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला असेल तर त्यात चुकीचे काही नाही. पुढच्या विधानसभा निवडणुकीला आणखी पाच वर्षांचा कालावधी बाकी असला तरी नजीकच्या कालावधीमध्ये राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिका या व्यतिरिक्त काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या ठिकाणी कदाचित स्वबळाचा प्रयोग करण्याचा मोह उद्धव ठाकरे यांना होऊ शकतो.
मुंबई महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर उद्धव ठाकरे यांनी दीर्घकाळ एकतर्फी सत्ता मिळवली आहे. या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने केवळ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच नव्हे तर इतर अनेक पक्षांना स्वबळ आजमावण्याचा मोह झाला तर नवल असणार नाही. या विधानसभा निवडणूक निकालाने राज्यातील राजकीय समीकरणे नजिकच्या कालावधीमध्ये बदलली जाण्याचे संकेत देण्यास प्रारंभ केला आहे. या समिकरणांचे गणित निश्चितच मनोरंजक असणार आहे.





