वनमंत्री राठोड देणार राजीनामा???

मुख्यमंत्री, शिवसेना आणि आघाडी सरकारच्या प्रतिमेचा सवाल

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्येचा संशय आणि मुख्यमंत्र्यांचे निर्देश धुडकावून पोहरादेवी येथे हजारोंची गर्दी जमवल्याच्या प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री संजय राठोड अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. कारवाई करण्यापूर्वी तू निर्णय घे, अशा शब्दांत पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजावले आहे.

दि. १ मार्चपासून मुंबईत विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी विरोधक रान उठवणार आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याचे निश्चित केले आहे, अशी खात्रीलायक माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. तत्पूर्वी, शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी राठोड यांचा राजीनामा घेण्याबाबत पवारांनी सल्ला दिला होता. तसेच राठोड यांच्या राजीनाम्याबाबत महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांत एकमत आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री, शिवसेना आणि आघाडी सरकारच्या प्रतिमेचा सवाल आहे. तसेच ज्या वेळेस मंत्र्याविरोधात गंभीर आरोप होतात, तेव्हा राजीनामा घेतला जातो असे शरद पवार यांनीही मुख्यमंत्र्यांना सुचवले आहे, असे शिवसेनेतील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

मंत्रिपदावरून दूर केल्यास विरोधकांच्या हल्ल्यास बळी पडल्यासारखे होईल, त्यामुळे राठोड यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. तसेच मी कारवाई करण्यापूर्वी तू निर्णय घे, असे उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना वर्षा बंगल्यावरील बैठकीत सांगितले होते. या वेळी आघाडी सरकारमधील वरिष्ठ मंत्रीही उपस्थित होते. आघाडीतील घटक पक्षांचे एकमत झाल्याने राठोड अधिवेशनापूर्वी राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती शिवसेनेतील वरिष्ठ पदावरील सूत्रांनी दिली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी भाजपकडून प्रथमच लेखी तक्रार अर्ज करण्यात आला आहे. खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांनी वानवडी पोलिसांना तक्रार अर्ज दिला आहे. वनमंत्र्यांंच्या दबावाला व छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली असून संजय राठोडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.