पुणे – वनविभागाकडून अभयारण्य परिसरातील वनजमिनींवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. ऑगस्ट 2020 पर्यंत जिल्ह्यातील चार अभयारण्य परिसरातील सात अतिक्रमणे हटवली आहेत.
प्रामुख्याने रहिवासी आणि शेती प्रकारातील ती असल्याची माहिती विभागाने दिली. वनजमिनींवरील अतिक्रमण हा अलीकडील काळात वनविभागासाठी महत्त्वाचा विषय बनला आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वनजमिनीची मोजणी करून त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी विभागाकडून प्रयत्न होत आहे. वनविभागातर्फे 2019-2020 या कालावधीत विविध प्रादेशिक विभागांमधील तब्बल 400 हेक्टर वनजमिनींवरील अतिक्रमणे हटवली आहेत.
मात्र, प्रादेशिक विभागांमधील वनक्षेत्राबरोबरच जिल्यातील अभयारण्य क्षेत्रातही अतिक्रमणाच्या घटना समोर आल्या आहेत. अभयारण्य परिसरातील वनजमिनींवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी पुणे वनविभागाच्या वन्यजीव विभागाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे.