कोथरूडच्या घटनेनंतर आता वनविभाग “अलर्ट’

"तातडीच्या' स्वरूपात करणार संसाधन खरेदी

पुणे  – कोथरूडमधील गवा बचाव मोहिमेच्या घटनेनंतर वनविभागाने आपल्याकडील सर्वच वनपरिक्षेत्राकडील संसाधनांबाबत सखोल आढावा घेण्यात आला आहे. यात आता काही संसाधनांची खरेदी प्रक्रिया  “तातडीच्या’ स्वरूपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जाळी, ट्रान्क्विलीझर, पिंजरे, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट, सुरक्षा जॅकेट यांसारख्या सुरक्षा संसाधनांचाही समावेश असणार आहे.

 

 

पुणे शहर परिसरात मानवी वस्तीत वन्यप्राणी आढळतात. यामध्ये बिबट्याचादेखील समावेश आहे. तर अन्य वन्यप्राणीही काही प्रमाणात आढळतात. कोथरूड येथे गवा आढळल्यानंतर वनविभाग आणि स्वयंसेवक संस्थांनी बचाव मोहीम राबवली. यादरम्यान वनाधिकारी आणि इतर स्वयंसेवक यांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. विशेषत: सुरक्षा संसाधनांचा प्रश्न यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

 

यावर मुख्य वनसंरक्षक सुजय दोडल यांनी पुणे वनविभागाअंतर्गत सर्व वनपरिक्षेत्रांच्या प्रमुखांना त्यांच्याकडील उपलब्ध संसाधने, आवश्यक संसाधने यांची यादी मागितली. यानंतर वनपरिक्षेत्रांच्या गरजेनुसार ही संसाधनांची खरेदी निश्चित केली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव विभागाच्या मुख्यालयाकडे सोपविण्यात येणार आहे, अशी माहिती दोडल यांनी दिली.

 

 

खेड, भोर हद्दीतही मिळणार ट्रान्क्विलीझर :

वनविभागातर्फे आतापर्यंत ज्या ठिकाणी वन्यप्राणी मानवी वस्तीजवळ आढळले आहेत, केवळ त्याच कार्यालयामध्ये ट्रान्क्विलीझर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, आगामी काळात कोणता वन्यप्राणी नेमका कुठे दिसू शकतो, याबाबतची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: पुणे आणि आसपासच्या भागात बिबट्याचा वावर सातत्याने वाढत आहे. ही बाब लक्षात घेत, सर्वच वन परिक्षेत्रांमध्ये ट्रान्क्विलीझर उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार खेड आणि भोर या दोन्ही वनपरिक्षेत्रांमध्येही लवकरच त्याची उपलब्धता होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.