नवी दिल्ली – नोव्हेंबर महिन्यात भारताची आयात वाढली तर निर्यात कमी झाली आहे. विशेष म्हणजे या महिन्यांमध्ये सोन्याची आयात विक्रमी पातळीवर वाढली. यामुळे नोव्हेंबर महिन्यात परकीय व्यापारातील तूट वाढून 37.84 अब्ज डॉलरवर गेली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात भारताची निर्यात 8.85 टक्क्यांनी कमी होऊन 32.11 अब्ज डॉलर झाली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारताची निर्यात 33.75 अब्ज डॉलरची होती.
निर्यात कमी झाली असतानाच नोव्हेंबर महिन्यात आयात मात्र 27 टक्क्यांनी वाढून 69.95 अब्ज डॉलर झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 55.06 अब्ज डॉलरची आयात झाली होती. आयात वाढल्यामुळे आणि निर्यात कमी झाल्यामुळे नोव्हेंबर महिन्यातील भारताची व्यापारातील तूट वाढून 37.84 अब्ज डॉलर झाली आहे. भारत सरकार सोन्याचे आयात कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच नोव्हेंबर महिन्यामध्ये सोन्याची आयात विक्रमी पातळीवर म्हणजे 14.8 अब्ज डॉलरची झाली आहे.
अर्थ मंत्रालयाने यावर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात बरीच घट केली होती. सध्या जागतिक बाजारात सोन्याचे दर उच्च पातळीवर आहेत. मात्र सोन्याची आयात वाढत आहे. ही सरकारची डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे सरकार सोन्याची आयात कमी करण्यासाठी काही उपाययोजना करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
एप्रिल – नोव्हेंबर दरम्यान भारताची निर्यात केवळ 2.17 टक्क्यांनी वाढून 284.31 अब्ज डॉलर झाली आहे. या कालावधीत आयात मात्र 8.35 टक्क्यांनी वाढून 486 अब्ज डॉलर झाली आहे. व्यापारातील तूट वाढल्यानंतर चालू खात्यावरील तूट वाढते आणि त्याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावर होतो. त्यामुळे सध्या रुपयाचे मूल्य निचांकी पातळीवर आहे. या आघाडीवर सरकारला उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.