इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना विदेश दौऱ्यांसाठी मनाई केली आहे. आपल्या परवानगी शिवाय परदेश दौऱ्यांचे नियोजन करण्यात येऊ नये, असे या सूचनेमध्ये म्हटले आहे. आपण स्वतः देखील परदेश दौरे करत नसल्याचेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या संसदेतील सदस्य रियाझ फतयाना हे ग्लासगो येथे आंतरराष्ट्रीय वातावरण बदलाच्या परिषदेला गेले होते. तेथे त्यांच्या वादावादीचे प्रकरण खूपच गाजलेले होते. या मुद्द्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत खूपच चर्चा झाली होती. त्या पार्श्वभूमीवर जर आपण स्वतः परदेश दौऱ्यांना जात नसू तर मंत्रिमंडळातील आपल्या सहकारी मंत्र्यांनीही परदेश दौऱ्याला जाणे टाळायला पाहिजे, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानमधील संसद सदस्य आणि स्तानिक विधानसभांचे सदस्य हे मंत्र्यांपेक्षाही अधिक परदेश दौरे करत असतात, असे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी म्हटलेले आहे. पाकिस्तान सरकारच्या परदेश दौऱ्यांनाच यापुढे सर्वाधिक महत्व असणार आहे. त्यामुळे अनावश्यक परदेश दौऱ्यांना ब्रेक लावला गेला पाहिजे, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.