पुणे : शिक्षणासाठी वेगवेगळ्या देशात जाणारा विद्यार्थी हा संस्कृती व मूल्य घेऊन जात असतो. एकमेकांची संस्कृती व मूल्ये समजून घेणे हाच शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचा मूलस्रोत आहे. कोणीही परदेशी विद्यार्थ्यांकडे केवळ ग्राहक म्हणून पाहू नये. कारण त्यांच्या देशात परतल्यानंतर ते अप्रत्यक्षपणे शिक्षण घेतलेल्या देशाचे ॲम्बॅसिडर म्हणून काम करतात, असे प्रतिपादन सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी शनिवारी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्रातर्फे आयोजित इंटरनॅशनलायजेशन ऑफ हायर एज्युकेशन डायलॉग अँड ग्लोबल एज्युकेशन फेअरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळाणकर, यूजीसीचे माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, विद्यापीठच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे उपस्थित होते.
डॉ. गोसावी म्हणाले, विद्यापीठाने वेगवेगळ्या देशात उपकेंद्रे सुरू केली जात आहेत. त्यामुळे विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांमध्ये पुढील काळात वाढ होणार आहे. डॉ. देवळाणकर यांनी नॅक मूल्यांकनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात इंटरनॅशनलायजेशन ऑफ हायर एज्युकेशनला तिसऱ्या क्रमांकाचे प्राधान्य दिल्याने त्याबाबत चर्चा होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. प्रास्ताविकात डॉ. विजय खरे यांनी विद्यार्थ्यांना एकाच छताखाली विविध देशांतील विद्यापीठांच्या प्रवेशाची माहिती उपलब्ध झाल्याचे सांगितले.
साहित्य, कलेला पोत्साहन
बदलत्या स्थितीत भारताला अनेक संधी आहेत. शिक्षक व शिक्षण पद्धती हे महत्त्वाचे घटक आहेत. केवळ विद्यार्थी- शिक्षक देवाण घेवाण उपयोगाची नाही. संस्कृती, साहित्य, कला यांना प्रोत्साहन द्यायला हवे, तसेच स्थैर्य, शांतता, विकासासाठी जागतिक नागरिक तयार होण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असे आईसीएसएसआरचे माजी अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले.