विदेश वृत्त – ‘या’ कारणामुळे रशियावर निर्बंध घालण्याची अमेरिकेची हालचाल

वॉशिंग्टन – रशियाकडून अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर हॅकिंग केले जाणे तसेच निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केल्याचा परिणाम म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन रशियावर निर्बंध करण्याची तयारी करत आहेत. बायडेन यांच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

गेल्यावर्षी रशियन हॅकरनी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात हॅकिंग घडवून आणले होते. सोलर विंडस या नावाने प्रसिद्ध असलेल्या या हॅकिंगमागे रशियाचा हात असल्याचे उघड झाल्यापासून अमेरिकेकडून रशिया विरोधात कारवाई केली जाण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात होती. या हॅकिंग प्रकरणात अमेरिकेतील नऊ सरकारी एजन्सीचे नेटवर्क भेदण्यात आले होते. सरकारी गोपनीय माहिती मिळवण्याच्या उद्देशातून हॅकिंग करण्यात आल्याचा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचा संशय आहे.

याशिवाय अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची फेरनिवड व्हावी यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी विशेष प्रयत्न केला असल्याचा आरोपही अमेरिकेने गेल्या महिन्यात केला होता. मात्र याप्रकरणी रशिया किंवा अन्य कोणीही मतदानात फेरफार केल्याचा कोणताही पुरावा मिळू शकलेला नाही.

अमेरिकेकडून आज किंवा उद्या विरोधातील निर्बंध जाहीर केले जाण्याची शक्‍यता आहे. हे निर्बंध किती व्यापक आणि कोणत्या स्वरूपाचे असतील हे देखील लगेच स्पष्ट होऊ शकलेले नाही. निर्बंध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेकडून रशियाला सज्जड दम दिला जावा आणि भविष्यात कोणत्याही प्रकारची आगळीक रशियाने टाळावे या हेतूने स्पष्ट इशारा असावा, अशी शक्‍यता आहे. अमेरिका आणि रशियातील संबंध यामुळे आणखीनच ताणले जाण्याची शक्‍यता आहे.

एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
गेल्या महिन्यात वृत्तवाहिनीवरील एका मुलाखतीत बायडेन यांनी पुतीन यांना मारेकरी म्हणून संबोधले होते. त्याची प्रतिक्रिया म्हणून पुतीन यांनी अमेरिकेच्या राजदूतांना पाचारण करून अमेरिकेतील गुलामगिरीच्या प्रथेची आठवण करून दिली होती. अमेरिकेत स्थानिक इंडियन जमातीचे शिरकाण आणि अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणुबॉम्बमध्ये किती नरसंहार केला होता याची आठवणही करून दिली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.