विदेश वृत्त | रॉकेट हल्ले होत असलेल्या इस्रायलमधील पॅलेस्टाईन नागरिकांचा संप सुरू

गाझा सिटी, दि. 18 – संपूर्ण इस्रायल आणि संलग्न भागातील पॅलेस्टाईन नागरिकांनी आज सामूहिक संपाला सुरुवात केली. इस्रायलच्या धोरणांच्या विरोधात जाऊन हा सामूहिक संप पुकारण्यात आला आहे. गाझावर इस्रायलचे रॉकेट हल्ले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून हमासचे नियंत्रण असलेल्या भागातूनही रॉकेटचा मारा होत असतानाच हा संप सुरू झाला आहे.

दोन्ही बाजूंपैकी कोणीही मागे हटण्याची तयारी दर्शवत नसल्यामुळे शस्त्रसंधीचे प्रयत्न विफल ठरले आहेत. त्यातच पॅलेस्टाईन नागरिकांचा सामूहिक संप आणि आंदोलनांमुळे इस्रायलमधील जातीय संघर्ष आणि वेस्ट बॅंकच्या भोवतालच्या भागातील आंदोलनही अधिक भडकण्याची चिन्हे आहेत.
आज झालेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये ग्रंथायल आणि इस्लामिक युनिव्हर्सिटीशी संबंधित शिक्षण संस्था असलेली एक सहा मजली इमारत कोसळली.

या हल्ल्यातून वाचलेल्या लोकांना या इमारतीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या इमारतीतील रहिवाशांना इस्रायलने पूर्वीच इशारा दिला होता. त्यामुळे रहिवाशांनी पहाटेच्या अंधारात पळ काढून जीव वाचवला होता. त्यामुळे या हल्ल्यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दहशतवाद्यांचे तळ, बंकर आणि रॉकेट लॉंचरना लक्ष्य केले जात असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

गाझामध्ये इस्रायलकडून होत असलेल्या रॉकेट हल्ल्यांमुळे तेथील पाणी, इंधन, वैद्यकीय साधनांचा मोठा तुटवडा निर्माण झला आहे. गाझातील रहिवासी भागात इस्रायलने केलेल्या हल्ल्यात सोमवारी 10 जण ठार झाले. त्यामध्ये 5 वर्षाच्या एका मुलाचाही समावेश आहे.
इस्रायल आणि हमासमधील हा संघर्ष 2014 पासूनचा आतापर्यंतचा सर्वात भीषण संघर्ष आहे. यामध्ये समेट घडवण्याचे प्रयत्न निष्फ्ळ ठरले आहेत. इजिप्तच्या मध्यस्थांकडून मध्यस्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

अमेरिकेनेही या युद्धाबाबत चिंता व्यक्‍त केली आहे. मात्र संघर्ष त्वरित थांबवण्याची मागणी केलेली नाही. इस्रायलकडूनही हे युद्ध सुरूच ठेवले जाण्याचे संकेत दिले जात आहेत.

इस्रायलवर वंशभेदाचा आरोप
इस्रायलमध्ये पॅलेस्टाईन नागरिकांची संख्या 20 टक्के आहे. इस्रयलने 1967 साली ताब्यात घेतलेल्या पॅलेस्टाईनच्या प्रदेशातील हे रहिवासी आहेत. हे लोक आपल्या स्वतंत्र देशाची मागणी करत आहेत. संघर्ष सुरू झाल्यापासून गाझामधील सर्व व्यवहार जवळ जवळ ठप्प झाले आहेत.

गाझामधील युद्ध थांबवावे आणि इस्रायलच्या धोरणांना विरोध करण्यासाठी हा संप पुकारला गेला आहे. ज्यूंना दिले गेलेले अधिकार पॅलेस्टाईनींना नाकारले जात आहेत. या वंशभेदाच्या धोरणाला या संपाद्वारे विरोध केला गेला आहे. मात्र असा वंशभेदाचा आरोप इस्रायलने फेटाळला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.