रियाध, दि. 18- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नुकतेच सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाऊन आले. तेथे त्यांना गेल्या वेळेपेक्षा वेगळी ट्रीटमेंट मिळाल्यामुळे पाकच्या गोटात उत्साहाचे वातावरण असताना त्यांना धक्का देणारी एक बातमी आहे.
दोन दिवसांपूर्वी सौदीने पाकिस्तानी नागरिकांच्या बाबत एक कडक नियम जारी केला आहे. त्यानुसार ज्या पाकिस्तानी नागरिकांनी करोनासाठी चिनी लस घेतली आहे, त्यांना प्रवेशबंदी केली गेली आहे असे समजते.
दोन दिवसांपूर्वी सौदीने पाकिस्तानी नागरिकांना 14 दिवस विलगीकरणात राहावे लागेल असा निर्णय घेतला होता, पण तो आता बदलला गेला असून चिनी लसीकरण झाले असेल तर त्या पाकिस्तानी लोकांना सौदीत प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे सौदीने चीनच्या साईकोवॅक आणि साईनोफार्म या दोन्ही करोना लसींना मान्यता दिलेली नाही. चीनने लस डिप्लोमसीखाली सौदीला या लसीचे डोस पाठविले होते, पण सौदीने त्याचा वापर केलेला नाही असेही समजते.