कराची – बेल्ट ऍन्ड रोड अंतर्गत पाकिस्तानातील विविध भागांमध्ये चीनच्या माध्यामातून करण्यात येत असलेले विविध विकास प्रकल्प चीनने थांबवले आहेत. पाकिस्तानातील कोहिस्तान जिल्ह्यातल्या दासू जलविद्युत प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी एका बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये चीनचे 9 इंजिनिअर ठार झाले होते.
त्यानंतर चीनने या प्रकल्पासाठी उच्चस्तरीय कमिटी नियुक्त करणे पुढे ढकलले आहे. चीनने हे प्रकल्प थांबवल्यामुळे अब्जावधी डॉलरचा हा प्रकल्प थंड पडला आहे. पाकिस्तानने या बॉम्बस्फोटाचा तपास करावा, अशी मागणी चीनने केली आहे.
चीन पाकिस्तान आर्थिक कोरिडोरमध्ये खंड पाडण्याच्या उद्देशानेच या कामात अडथळे आणते जात आहेत. पूर्वीही बलुचिस्तान प्रांतात सीपीईसीच्या प्रकल्पांवर अशाच प्रकारे हल्ले केले गेले होते. मात्र, आता हा हल्ला चीनजवळच केला गेला आहे, असे पाकिस्तानातील दहशतवादविषयक तज्ज्ञांनी म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये चीनच्या कर्मचाऱ्याना सुरक्षा देण्यात यावी, अशीही मागणी चीनच्या वतीने करण्यात येते आहे.
सीपीईसी अंतर्गत 50 अब्ज डॉलरचे प्रकल्प पाकिस्तानमध्ये उभारले जात आहेत. मात्र, त्यासाठीची उच्चस्तरीय कमिटी नियुक्त करणे चीनने लांबणीवर टाकल्याने आता या प्रकल्पांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.