गया – बिहार मध्ये बौद्ध गया येथे आलेले पाच विदेशी नागरीक कोविड ग्रस्त असल्याचे चाचणीत आढून आले आहे. या पाच परदेशी नागरीकांपैकी चार थायलंडचे आणि एक म्यानमारचा आहे. गया जिल्ह्याचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. रंजन कुमार सिंग यांच्या म्हणण्यानुसार, बोधगयाला भेट देणाऱ्या विदेशी नागरीकांची आंतरराष्ट्रीय विमानतळावर चाचणी घेण्यात आली.
वीकेंड दरम्यान एकूण 33 परदेशी लोकांची चाचणी घेण्यात आली, त्यापैकी पाच जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यात चार महिला आहेत. हे संक्रमीत नागरीक 35 ते 75 वयोगटातील असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांनी ज्या हॉटेलमध्ये चेक इन केले आहे तेथेच त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या पार्श्वभूमीवर, विमानतळ आणि गया रेल्वे स्थानकावर पर्यटकांची चाचणी घेण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात आली आहे.