इस्लामाबाद – अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारमधील प्रभारी परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तगी यांना ट्रोल्का प्लस बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पाकिस्तानने विशेष निमंत्रण दिले आहे. यानुसार मुत्तगी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे.
“ट्रोल्का प्लस’ बैठकीसाठी अफगाणिस्तान, अमेरिका, चीन, रशिया आणि पाकिस्तानचे विशेष प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ही बैठक गुरूवारी इस्लामाबादेत होणार आहे. मात्र त्यानंतर आणखीन एक दिवस मुत्तगी इस्लामाबादेतच राहतील आणि पाकिस्तानच्या विविध नेत्यांच्या भेटी घेतील.
यावेळी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान द्विपक्षीय वाटाघाटी केल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र मुत्तगी यांच्या या संभाव्य दौऱ्याबाबत अद्याप अफगाणिस्तानकडून कोणतेही स्पष्टिकरण देण्यात आलेले नाही.
मुत्तगी तालिबानचे सर्वात वरिष्ठ मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या या पाकिस्तान दौऱ्याला विशेष महत्व असणार आहे. पाकिस्तानने अद्याप तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही. मात्र पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी हे अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी मुत्तगी यांना पाकिस्तान दौरयाचे निमंत्रण दिले होते. मुत्तगी यांनी ते निमंत्रण स्वीकारले असल्याचे कुरेशी यांनी तेंव्हाच सांगितलेले होते.