विदेश लोककथा : द चाइल्डलेस रिच मॅन

शर्मिला जगताप

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. यॉन साम्राजात चीनमध्ये एक धनाढ्य व्यापारी राहात असे. त्याच्याकडे खूप खूप पैसा होता; पण त्याला एकही मूलबाळ नव्हते. त्यामुळे तो आणि त्याची पत्नी स्वतःला खूपच एकटे समजत असत. आपल्याला एखादे मूल असावे असे त्यांना मनापासून वाटत होते; पण एकही मूल नसल्यामुळे ते दोघे खूप दुःखी होते. तो धनवान मनुष्य नेहमी विचार करीत असे की, आपल्याकडे एवढा पैसा असूनही त्याचा काहीच उपयोग नाही. काय करायचे आहे या संपत्तीचे. असे म्हणून तो धनवान मनुष्य नेहमी गरिबांना दानधर्म करीत असे. दुसऱ्यांच्या मुलांबाळासाठी पैसे खर्च करीत असे.

एके दिवशी त्याचा जीवलग मित्र त्याला भेटण्यासाठी आला आणि त्याला म्हणाला की, मी तुला सल्ला देतो की, आपल्या राज्यातील मंदिरामध्ये एक थोर तपस्वी ज्ञानी महापुरुष आले आहेत. तू त्यांना जाऊन भेट. त्यांच्याशिवाय तुला कोणीच या दुःखातून बाहेर काढू शकत नाही. मित्राचे बोलणे ऐकून तो धनवान मनुष्य आणि त्याची पत्नी दोघेही मंदिरात जातात. मंदिरात नीरव शांतता असते. तिथला परिसर आल्हाददायक असतो. गार हवेची झुळूक मनाला आनंद देऊन जाई. मंदिर परिसर वनराजीने नटलेला होता.

ते मंदिरात जाऊन त्या तपस्वी महापुरुषाची वाट पाहात बसतात. काही वेळाने महापुरुष त्यांना भेटावयास बोलावतात. त्यांचा एक शिष्य येऊन गुरूंनी बोलावल्याचे त्यांना सांगतो. ते लगबगीने उठून महापुरुषाला भेटण्यास जातात. त्या ज्ञानी महापुरुषाच्या डोक्‍यावर प्रभा असते. तेजपुंज चेहरा पाहून ते दोघे त्यांना वंदन करतात.

महाराज त्यांना येण्याचे कारण विचारतात. तेव्हा ते दोघेही आपले दुःख त्या महापुरुषांना सांगतात. आपल्याकडे धनदौलत असूनही एकतरी मूलबाळ असावे, अशी इच्छा त्यांनी महापुरुषाकडे व्यक्‍त केली.

महापुरुष आपल्या विद्येने त्या धनवाचा भूतकाळ आणि भविष्य पाहतात. महापुरुष त्या धनवानाला म्हणतात की, मागील जन्मी तू खूप प्राणी हिंसा केली आहे. इतक्‍या मुक्‍या प्राण्यांना मारले आहेस की त्यांची गणती करणे देखील अशक्‍य आहे.

हजारो लाखो प्राण्यांच्या पिलांना तू मारले आहेस म्हणून या जन्मी त्याची शिक्षा म्हणून तुला एकही मूलबाळ झाले नाही. तो धनवान मनुष्य हे ऐकून हादरतो. ते दोघे पती-पत्नी एकमेकांकडे पाहू लागतात. ते महापुरुषाला यावर उपाय विचारतात. तेव्हा महापुरुष सांगतात की, तुला जर या जन्मात पुत्रप्राप्ती हवी असेल तर आठ अब्ज प्राण्यांना जीवदान द्यावे लागेल. हा एकच मार्ग मला दिसतो आहे.

महापुरुषांनी सांगितलेल्या उपायावर ते दोघे सहमती दर्शवितात. महापुरुषांना पुन्हा वंदन करून ते दोघे घरी परततात. त्यानंतर ते अहिंसा धर्म पाळतात. प्राण्यांना जीवदान द्यायला सुरुवात करतात. बाजारात मांसासाठी विक्रीस ठेवलेली कुत्री, मांजरी, कोंबड्या, शेळी, मेंढ्या, बैल, वराह असे अनेक प्राणी विकत घेतात.

या प्राण्यांसाठी एक सुरक्षित जागा निर्माण करून तिथे त्यांना सोडतात. त्याचबरोबर मासे, खेकडे अशा प्राण्यांसही जीवदान देण्यासाठी जंगलात जाऊन तलावात सोडतात. असे करता करता काही वर्षे निघून जातात. त्यानंतर त्या धनवान मनुष्याला एक सुंदर सुदृढ कन्यारत्न प्राप्त होते. (येथे श्रद्धा-अंधश्रद्धेला महत्त्व दिलेले नसून चीनमधील लोकप्रिय लोककथेचा अनुवाद दिलेला आहे. यातून प्राणी हत्या करू नका, असा अहिंसेचा संदेश दिला गेला आहे.)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.