मुंबई – ऑक्टोबर महिन्यापासून भारताकडील परकीय चलन साठा वेगाने कमी होत होता. मात्र रिझर्व बँकेने केलेल्या काही उपाययोजनामुळे आता भारताकडील परकीय चलन साठ्यात वाढ होत आहे. 7 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा तब्बल 15.2 अब्ज डॉलरने वाढून 653.9 अब्ज डॉलर या पातळीवर गेला आहे. दोन वर्षात एखाद्या आठवड्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात परकीय चलन साठा वाढला नव्हता.
सप्टेंबरमध्ये अमेरिकेच्या रिझर्व बँकेने व्याजदरात अर्धा टक्के कपात केल्यानंतर बरीच परकीय गुंतवणूक भारतात आली. त्यावेळी भारताकडील परकीय चलन साठा 704.885 अब्ज डॉलर या विक्रमी पात्रेवर गेला होता. मात्र त्यानंतर घसरणार्या रुपयाला बळकट करण्यासाठी रिझर्व बँकेने बर्याच प्रमाणात डॉलर खर्च केले. त्यामुळे भारताकडील परकीय चलन साठा वेगाने कमी होत होता.
रिझर्व बँक भांडवल सुलभता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी 28 फेब्रुवारी रोजी रिझर्व बँकेने 10 अब्ज डॉलर खरेदी केले होते. त्यामुळेही भारताकडील परकीय चलन साठ्यात वाढ होण्यास मदत झाली आहे.
दरम्यान संबंधित आठवड्यामध्ये सोन्याच्या दरात जागतिक पातळीवर काही प्रमाणात घट झाली. त्यामुळे रिझर्व बँकेकडे असलेल्या सोन्याचे मूल्य या आठवड्यात एक अब्ज डॉलरने कमी होऊन 74.32 अब्ज डॉलर इतके झाले आहे. भारताची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडील ठेव 4.1 अब्ज डॉलर इतकी आहे.
भारताकडे सध्या असलेला परकीय चलन साठा तुलनेने कमी असला तरी तो भारताला एक वर्षाच्या आयातीसाठी पुरेसा आहे. त्यामुळे या आघाडीवर चिंता करण्याची गरज नाही. दरम्यानच्या काळामध्ये परकीय चलन साठ्याचे संवर्धन करण्यासाठी रिझर्व बँक प्रयत्न करत आहे. वाणिज्य मंत्रालय निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे.