नवी दिल्ली – कोलकात्याच्या प्रसिद्ध मिशनरी ऑफ चॅरीटी संस्थेला विदेशातून देणग्या स्वीकारण्यास गृहमंत्रालयाने अनुमती दिली आहे. एफसीआरए कायद्या अंतर्गत त्यांचेही रजिस्ट्रेशन रद्द करण्यात आले होते. परंतु त्या विषयी जोरदार आक्षेप नोंदवला गेल्यानंतर गृहमंत्रालयाने या संस्थेला विदेशातून निधी स्वीकारण्यास अनुमती दिली असून त्यांचे एफसीआरए रजिस्ट्रेशन कायम करण्यात आले आहे.
गृहमंत्रालयाने या संस्थेचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला होता परंतु आता तो कायम करण्यात आल्यानंतर त्यांना त्यांच्या बॅंक खात्यातील शिल्लक रक्कम वापरण्यास तसेच विदेशातून निधी घेण्यास अनुमती मिळाली आहे. या संस्थेविषयी काही गैरप्रकारांची माहिती मिळाल्यानंतर या संस्थेचे एफसीआरए रजिस्ट्रेशन 27 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आले होते.
या संस्थेचे बॅंक खातेही गोठवण्यात आले होते. या संस्थेवर करण्यात आलेल्या या कारवाईचा तृणमुल कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाने निषेध नोंदवून कारवाईला विरोध केला होता.
केंद्र सरकारने ही कारवाई केल्यानंतर ओडिसा सरकार या संस्थेच्या मदतीला आले आणि त्यांनी या संस्थेची ओडिसातील कोणतीही केंद्रे बंद पडू दिली जाणार नाहींत त्यांना गरज भासल्यास मुख्यमंत्री निधीतून पैसे दिले जातील असा निर्णय ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी जाहीर केला होता.
त्यानुसार त्यांनी या संस्थेला 78 लाख रूपयांची मदत मुख्यमंत्री निधीतून प्रदानही केली होती. तथापि आज मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाने या संस्थेची रद्द केलेली अनुमती त्यांना पुन्हा प्रदान केली.