गोंदवले – विदेशी लोकांना भारतीय संस्कृतीबद्दल आस्था असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सातासमुद्रापलीकडून आलेले भक्त गोंदवले बुद्रुक येथीर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज समाधी मंदिरात भक्तिरसात रंगले होते. भक्तीला कशाचेच बंधन नसते, हे त्यांनी दाखवून दिले. अध्यात्माची वाट चोखळणारे हे परदेशी भाविक ब्रह्मचैतन्य महाराज समाधीवर माथा टेकवून धन्य झाले. त्यांनी राम नामाचा जयघोषही केला.
संस्कृती आणि अध्यात्मिकता म्हणून युरोपातील तेरा देशांमधील भाविकांनी भारतीय पेहराव करून ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरात नामसाधना केली. जगभरातील संत, महात्म्यांच्या आठवणींचा ठेवा असणारे आंतरराष्ट्रीय संग्रहालय जर्मनीत उदयास येत आहे. यासाठी विविध देशांतील काही अध्यात्मिक लोक एकत्र आले आहेत. त्यांचा जथा गोंदवल्यात आला होता.
ब्रह्मचैतन्य महाराजांवर श्रद्धा असलेले श्री स्वामी विश्वानंद यांच्यासमवेत भाविकांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. महाराजांनी राम नामाच्या माध्यमातून दिलेला संदेश अनोखा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या विदेशी पाहुण्यांनी नामसाधना मंदिर, गोशाळा, कोठीला भेट दिली. भोजनगृहात दुपारी प्रसादाचा आस्वाद घेतला. गावातील विविध मंदिरांमध्ये सायंकाळी जाऊन दर्शन घेतले. थोरल्या राम मंदिरात सुरू असलेल्या भजनातदेखील त्यांनी भाग घेतला. गोंदवल्याची आठवण म्हणून मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी या पाहुण्यांना ब्रह्मचैतन्य महाराजांची मूर्ती भेट दिली.
मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या घटली
गेल्या तीन दिवसांपासून सातारा शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उबदार कपडे घालून सातारकर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडत असले तरी वाढत्या थंडीमुळे मॉर्निंग वॉकला जाणारांची संख्या घटू लागली आहे. कुरणेश्वर मंदिर. यवतेश्वर घाट, शाहू स्टेडियम, दिव्यनगरी, आंबेदरे रोड, शाहुपुरीतील हुतात्मा उद्यान आदी ठिकाणी मॉर्निंग वॉकला येणारांची संख्या घटत आहे.