जबरदस्तीने वर्गणी गोळा केल्यास गुन्हे दाखल होणार

गणेशोत्सव नियोजनाच्या बैठकीत सूचनांचा पाऊस
ठोस निर्णयाविना मूर्तीच्या उंचीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा

सातारा  – वर्गणीच्या नावाखाली जबरदस्ती झाल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत सोमवारी दिला. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीची उंची, विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे तातडीने भरून घ्यावेत, जिल्हा परिषद जागेत कायमस्वरूपी विसर्जन तळे तयार करावे, प्रशासनाने प्लॅस्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्तींना बंदी घालावी, सार्वजनिक गणेश विसर्जनाचे ठिकाण निश्‍चित करावे यासह अनेक सूचनांचा पाऊस या बैठकीत पडला. मूर्तीच्या उंचीवर मात्र कोणताच निर्णय झाला नाही.

गणेशोत्सवाच्या नियोजनाच्या पार्श्‍वभूमीवर येथील अलंकार हॉलमध्ये जिल्हाधिकारी सौ. श्‍वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, तहसीलदार आशा होळकर, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीपकुमार जाधव, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. नगरसेवक धनंजय जांभळे, नरेंद्र पाटील, हेमांगी जोशी, मधुकर शेबंडे, अंजली कुलकर्णी, प्रकाश गवळी, वर्षा माडगूळकर, बाळासाहेब शिंदे, अजय कदम यांनी चर्चेत सहभाग घेतला.

सौ. श्‍वेता सिंघल म्हणाल्या, सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने वर्गणी गोळा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बांधकाम विभाग, नगरपालिका आणि विज वितरण विभागाने एकमेकांमध्ये समन्वय ठेवून हा उत्सव आनंदाने पार पाडावा. नागरिकांनी केलेल्या सूचनांप्रमाणे वीज वितरणच्या विद्युत वाहिन्या जमिनीखालून नेता येतात का, याची चाचपणी करावी. नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी एखाद्या ठिकाणावरून अतिक्रमण काढल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाले नाही ना, याची खातरजमा करून घ्यावी. नगरपालिकेने गणेश मंडळाची बैठक घेऊन प्रदूषणाबाबतच्या असणाऱ्या गाईडलाईन समजून सागाव्यात. प्रसंगी प्रदूषण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पावले उचलावीत. मंडळांनी मुख्य मूर्ती व पूजेची मूर्ती स्वतंत्र ठेवावी.”

तेजस्वी सातपुते म्हणाल्या, “”गणेशोत्सव साजरा करताना नावीन्यपूर्ण उपक्रमाकडे वाटचाल करावी. शहरांमध्ये मंडळांनी काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्या ठिकाणी मंडळांनी आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षात आहात, असा फलक लावावा, त्यामुळे समाजकंटकांना धाक बसण्यास मदत होईल. देखावे पाहण्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र रांग लावावी. ज्या ठिकाणी शांतता क्षेत्र घोषित केले आहे, त्या ठिकाणी आवाज नियंत्रित करावा. पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यात यावा.

नैसर्गिक तळ्यात गणेश मूर्ती विसर्जन केल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे स्वतंत्र तळे तयार करण्यावर विचारविनिमय सुरू आहे..” धनंजय जांभळे म्हणाले, “”गणेशोत्सवाच्या आधी शहरातील गल्लीतील व मुख्य मार्गावर पडलेले खड्डे तत्काळ बुजवून घ्याव्येत, मिरवणुकीवेळी वीज वितरणच्या केबलचा अडथळा होणार नाही, यादृष्टीने प्रशासनाने उपाय योजना कराव्यात.” सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीची उंची कमी असावी, याबाबत प्रत्येक वर्षी आयोजित केलेल्या बैठकीत चर्चा होते. मात्र, त्यावर प्रत्यक्षात कार्यवाही होत नाही, असे अंजली कुलकर्णी यांनी निदर्शनास आणून दिले.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान मंडळाचे कार्यकर्ते काठीच्या साह्याने वीजवाहिन्या वर उचलतात त्यामुळे घरगुती वीज खंडित होऊन अनेकांना त्रास होतो. त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. पारंपरिक वाद्याचा सराव कुठेही केला जातो. त्याचा विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो, त्यामुळे संबंधितांना योग्य त्या सूचना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. श्रीकांत शेटे म्हणाले, “”गणेश मंडळांनी विजेसाठी भरलेले डिपॉझिटचे पैसे परत मिळत नाहीत. त्यामुळे खासगी दुकानदारांकडून वीज घेणे योग्य ठरते.”

जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिपत्याखाली शेवटचे पाच दिवस बारा वाजेपर्यंत वाद्य वाजवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीची उंची कमी असावी. त्यामुळे कमी पाण्यात गणपती विसर्जन करण्यास मदत होईल, असे हेमांगी जोशी यांनी सांगितले. पोलीस बंदोबस्तासाठी एनसीसीचे विद्यार्थी घेतले जावेत, साखळी चोरीची घटना घडणार नाही, यादृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे सांगून मधुकर शेंबडे यांनी यावर्षी गणेश मंडळांनी खर्चात काटकसर करून दुष्काळग्रस्त भागासला मदत करावी, असे आवाहन केले. नरेंद्र पाटील म्हणाले, “”विसर्जनाची जागा निश्‍चित करावी. विशेषतः गणेशमूर्तीच्या उंचीबाबत प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा.” प्रकाश गवळी म्हणाले, गणेश मूर्तीच्या उंचीबाबत गेले अनेक वर्षे खल सुरू आहे. विसर्जन मार्गावरील लाईट्‌स पुरेशा नाहीत. त्याचा गांभीर्याने विचार व्हावा.”

साताऱ्यातील अतिक्रमणे काढणे अत्यंत गरजेची बाब झाली आहे. गणेश विसर्जनासाठी साताऱ्यात तळ्याची सुविधा उपलब्ध असताना प्रशासन लाखो रुपये खर्च करून नवीन तळे का करत आहे? याचा खुलासा व्हावा, अशी मागणी बाळासाहेब शिंदे यांनी केली. आवाजासंदर्भात निकष पाळला जात नाही, असे वर्षा माडगूळकर म्हणाल्या. शहरांमध्ये वीज वितरण योग्य पद्धतीने होत नाही. दिवसा लाईट चालू ठेवतात रात्री मात्र बंद करतात. त्यामुळे गणेश मंडळांनी सीसीटीव्ही लावून त्याचा काय उपयोग होणार, असा प्रश्‍न चिन्मय कुलकर्णी यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.