खेड-शिवापूर – मुलगी अल्पवयीन असून आणि तिची इच्छा नसतानाही लग्न लावून दिल्याचा प्रकार खेड-शिवापूर येथे घडला आहे. याप्रकरणी खुद्द मुलीनेच आई-वडील आणि सासरच्या लोकांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी राजगड पोलिसांनी मुलीचे आई-वडील आणि सासरची मंडळी अशा सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत राजगड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधित पीडित मुलीचे वय 17 वर्षे आहे. या मुलीची इच्छा नसतानाही मुलीचे आई-वडील आणि सासरची मंडळी यांनी संगनमत करून सोमनाथ कोंडे (रा. खेड-शिवापूर, ता. हवेली, पुणे) याच्याशी 20 मे रोजी खेड-शिवापूर येथील शिवराय मंगल कार्यालयात या मुलीचे लग्न लावून दिले.
मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार राजगड पोलिसांनी मुलीचे आई-वडील आणि सोमनाथ जगन्नाथ कोंडे, जगन्नाथ कोंडे, सोमनाथ कोंडेची आई (नाव माहिती नाही, सर्व रा. खेड-शिवापूर, ता. हवेली) तसेच जया शिळीमकर (रा. नाना पेठ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस हवलदार प्रमिला निकम पुढील तपास करीत आहेत.