पुणे – रूम पार्टनरकडून ड्रग्ज घेण्यास व स्मोकिंग करण्यास सतत केल्या जाणाऱ्या जबरदस्तीमुळे तरुणाने कंटाळून राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. सागर अशोक पवार (वय 18) असे तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुप्रसाद कॉलनी कर्वेनगर येथील पठाण बॉइज् होस्टेल येथे घडली.
याप्रकरणी वारजे-माळवाडी पोलिसांनी लक्ष्मण वासुदेव पाटील (वय 30, रा. कर्वेनगर, मूळ जळगाव) याला अटक केली. याबाबत मयत तरुणाचे चुलते दीपक केरबा पवार (वय 40, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी पाटील याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.
आरोपी हा मयत तरुणाला ड्रग्ज नाही घेतले तर जीवे मारण्याची धमकीदेखील देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी पाटील हा एका खासगी कंपनीत नोकरी करतो. तर मयत सागरदेखील खासगी नोकरी करतो. अनाथ असल्यामुळे आश्रम शाळेत शिक्षण घेतल्यावर त्याने एका मार्केटिंग कंपनीत नोकरी पत्करली.
मागील तीन ते चार दिवसांपूर्वीच सागर तेथे राहण्यास आला होता. त्याला दारू आणि सिगारेटचा तिटकारा असल्याचे समजते. आत्महत्या करण्यापूर्वी सागरने एक चिठ्ठी लिहिली असून त्यामध्ये आरोपी पाटील हा त्याला ड्रग्ज, स्मोकिंग करण्यास फोर्स करत असल्याचे लिहिले आहे. ती चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे.