रांजणगाव गणपती : कारेगाव येथील दर रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात स्वतःचा माल विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांकडुन कोणताही संबंध नसताना जबरदस्तीने जागेच्या भाड्यापोटी पैसे वसुल करणाऱ्या सोमनाथ ऊर्फ बंटी नवले या शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यासह ६ ते ७ जणांच्या विरोधात रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अण्णापुर येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज (वय ३७) रा. आण्णापुर, ता. शिरुर, जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असुन शिरुर-आंबेगाव शिवसेना (शिंदे गट) युवा उपप्रमुख सोमनाथ ऊर्फ बंटी नवले याच्यासह ६ ते ७ जणांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारेगावच्या हद्दीत आठवडे बाजारामध्ये, हॉटेल शेतकरी भोजनालय व टिपी मार्केटच्या मधुन जाणाऱ्या शासकीय जागेतील रस्त्याच्या कडेला आठवडे बाजाराच्या दिवशी निलेश वाळुंज आणि त्यांची आई मंदा वाळुंज असे दोघेजण स्वतःच्या शेतात पिकविलेला कोबी विकण्यासाठी आले होते. तसेच इतर शेतकरी व महिल यांनी देखील त्यांनी पिकविलेला शेतातील माल बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेला होता. त्यावेळी सायंकाळी ७:१५ वाजण्याच्या दरम्यान सोमनाथ उर्फ बंटी नवले आणि त्याच्या बरोबर त्याचे इतर ६ ते ७ साथीदार बाजारात आले.
त्यापैकी बंटी नवले हा फिर्यादी यांच्या आईला म्हणाला की, येथे बसायचे असेल तर तुला ५० रुपये दयावे लागतील. त्यानंतर फिर्यादी यांच्या आईने पैसे देण्यास नकार दिला म्हणुन त्याने आईच्या हातातील पन्नास रूपयांची नोट दादागिरी करुन घेतली. तसेच या गुंड प्रवृत्तीच्या दादागिरी करणाऱ्या ७ ते ८ जणांच्या टोळक्याने इतर शेतकरी आणि विक्रेते यांच्याकडुनही दमदाटी करुन जबरदस्तीने ४०, ५० ते १०० रुपये अशा पटीत बेकायदेशीर पैशाची वसुली केली. यामुळे शेतकरी व व्यापारी देखील घाबरुन गेले. काहींनी पैसे द्यायला नकार दिला तर हे टोळके त्यांचा भाजीपाला घेवुन गेले.
तसेच या घटनेला विरोध केला असता त्यांनी फिर्यादीला दम देत ‘ही जागा आम्हाला सरकारने वापरायला दिली आहे, याचे पैसे दिले नाही तर परत तुम्ही कसे या ठिकाणी बसता ते एके एकेला बघतोच असा दम दिला. तसेच फिर्यादी या टोळक्याला उद्देशुन मी पोलीसांना कळविले आहे असे म्हणाले असता सोमनाथ उर्फ बंटी नवलेसह इतर ६ ते ७ जणांनी दादागिरी करत ‘तुम्हाला कोणाला कळवायचे ते कळवा. पोलीसांना आम्ही घाबरत नाही. तसेच फिर्यादीला उददेशुन तुला पण बघुन घेईल असे म्हणत दादागिरी करत जबरदस्तीने पैसे वसुल करत तिथुन निघुन गेले. रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय गायकवाड हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.