उपविभागीय पोलीस अधिकारी टोम्पे : राजगुरूनगरात “भरोसा सेल’कक्षाचे उद्घाटन
राजगुरुनगर -पतीपासून त्रास असलेल्या महिला, मारहाण, विवाहबाह्यसंबंध, दुसरा विवाह आदी कारणांमुळे सुखी संसारात “कडवटपणा’ आल्याचे अलीकडच्या काळात दिसून येत आहे. याशिवाय पती-पत्नीचा एकमेकांवर विश्वास नसल्यानेही नाते दुरावले असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी केले.
खेड पोलीस ठाण्यात नव्याने सुरू करण्यात आलेल्या “भरोसा सेल’ कक्षाचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी टोम्पे बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी, आयपीएस ट्रेनी अधिकारी ऑचल दलाल, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, राज्य पोलीस संघटनचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा माहिते, हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्राचार्य एच. एम. जरे, खेड तालुका पोलीस संघटनेचे अध्यक्ष अशोक चौधरी, निर्भया पथकांच्या अर्चना गवारी, सुरेखा कसबे, दक्षता कमिटीच्या सदस्या रेखा क्षोत्रिय, संपदा सांडभोर, दिप्ती कुलकर्णी, जया बैरागी, ऍड. मनीषा पवळे, डॉ. शितल पवार, डॉ. रसिका साळुंके, अर्चना किर्लोस्कर, नाजयिन शेख, सुनील वाळुंज, राहुल वाळुंज यांच्यासह खेड तालुक्यातील विविध गावांचे पोलीस पाटील, हुतात्मा राजगुरू महाविद्यालतील प्राध्यापिका व विद्यार्थिनी, महात्मा गांधी विद्यालयातील प्राध्यापिका यावेळी उपस्थित होत्या.
गजानन टोम्पे म्हणाले की, हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचार यांसारख्या प्रकरणात अनेक महिलांना न्याय कुठे मागावा हेच समजत नाही. याबाबतचे कायदे केखील त्यांना माहीत नसतात. त्याचप्रमाणे त्यांचे वेळीच समुपदेशन न झाल्यास संसार रस्त्यावर येतो.
हा प्रकार टाळण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी “भरोसा सेल’मध्ये दोन्ही बाजूंचे समुपदेशन केले जाणार आहे. या सेलमध्ये पीडित महिलेला विधिविषयक, मानसोपचार, वैद्यकीय मदत एकाच ठिकाणी मिळेल. त्यामुळे हा कक्ष सुरू करण्यात आला आहे.
अरविंद चौधरी म्हणाले, भरोसा सेल कक्षाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला व बालकांचे प्रश्न सोडविण्यास निश्चितच मदत होईल. तसेच कौटुंबिक प्रश्न सोडविण्यासाठीही या कक्षाची मोठी मदत होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस हवालदार संतोष मोरे यांनी तर महिला पोलीस सुरेखा भोर यांनी आभार मानले.
ठळक बाबी…
माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समाजातील हिंसेचे स्वरूप बदलत आहे. यासाठी समाजात कायद्याचे भय असणे आवश्यक
पीडित महिला, मुले व ज्येष्ठ नागरिक यांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे
महिला सहायक कक्षांतर्गत पोलीस मदत, महिला हेल्पलाइन, समुपदेशन, वैद्यकीय, विधीविषयक सेवा, मानसोपचार तज्ज्ञ, पीडित महिलांचे पुनर्वसन, कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण सेवेचा समावेश
महिलांना अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी मानसिक बळ या भरोसा सेल कक्षामार्फत मिळणार