विधिमंडळाच्या अभ्यासासाठी आ. पवार ग्रंथालयात

शरद पवारांच्या सल्ल्यानुसार पवार ग्रंथालयात
कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत – जामखेडमधून पहिल्यांदाच निवडून आलेले आ. रोहित पवार यांनी नुकतीच विधिमंडळाच्या ग्रंथालयाला भेट दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्ल्याने विधिमंडळ कामकाजाच्या अभ्यासासाठी आ. पवार यांनी हे पाऊल उचलले आहे. नवनिर्मितीक्षम व उपक्रमशील लोकप्रतिनिधी म्हणून पवार यांची ओळख आहे. विविध क्षेत्रातील नवनवीन गोष्टी शिकून त्यात परिपूर्ण बनण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. यापुढील काळात त्यांना संसदीय राजकारणात वाटचाल करायची असल्याने त्यांनी ग्रंथालयातील जुन्या कामकाजाचे अध्ययन करायला सुरुवात केलेली आहे.

ग्रंथपाल उपसचिव बाबा वाघमारे तसेच सहकाऱ्यांनी आ. पवार यांना ग्रंथालयाबाबत सविस्तर माहिती दिली. गेल्या अनेक वर्षातील विधिमंडळातील चर्चा, महत्वाच्या विषयांवर झालेले वादविवाद, ज्येष्ठ नेत्यांची भाषणे ग्रंथालयात संकलित करून ठेवण्यात आलेली आहेत. राज्यातील विविध योजनांचे अहवाल, वृत्तपत्रातील महत्त्वाच्या बातम्या, लेखांची कात्रणे यांचाही संग्रह ग्रंथालयात करून ठेवण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचा राजकीय अभ्यास करण्यासाठी विधिमंडळ ग्रंथालयाचे विशेष महत्त्व आहे. यशस्वी राजकीय वाटचाल करण्यासाठी महत्त्वाचे असलेल्या या ग्रंथालयास आ. पवार यांनी भेट दिली आहे.त्याबाबत कौतूक होत आहे.

इथून पुढे मुंबईतील माझा जास्तीत जास्त वेळ या ग्रंथालयातच जाणार आहे. माझ्या तरुण सहकाऱ्यांनीही ग्रंथालयातील माहितीचा लाभ घ्यावा. मतदारसंघाच्या तसेच राज्याच्या विकासकामात त्याचा नक्कीच लाभ होईल. पवार साहेबांनी दिलेला प्रत्येक सल्ला कसा योग्य असतो त्याचाही यावेळी अनुभव आला
– रोहित पवार, आमदार.

Leave A Reply

Your email address will not be published.