वृक्षगणनेसाठी कराड पालिकेला सापडेना मुहूर्त

वृक्षसंवर्धनाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर
कराड –
शहरातील वृक्षांची गणना पालिकेच्यावतीने गेल्या पाच ते सहा वर्षांपासून झालेली नाही. तर शहरातील वृक्षांचे संवर्धनासाठी तयार करण्यात आलेली वृक्ष संवर्धन प्राधिकरण समिती नुसती नावालाच उरली आहे की काय? असा प्रश्‍न नागरिकांमधून विचारला जात आहे. वृक्षतोडीबाबत पर्यावरणप्रेमींकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे शहरातील वृक्षसंवर्धनाचा प्रश्‍न पुन्हा एखदा ऐरणीवर आला आहे.

पालिकेकडून शहरातील वृक्षांची गणना होत नसल्याने सर्वप्रथम 2011-12 साली एन्व्हायरो नेचर फ्रेन्डस क्‍लबच्यावतीने वृक्षगणनेस प्रारंभ झाला. त्यावेळी शहरात 21 हजार 276 झाडे असल्याचा अहवाल क्‍लबच्यावतीने देण्यात आला होता. आज याला पाचपेक्षा जास्त वर्षे पूर्ण झाली आहेत. तरी अद्यापही पालिकेकडून शहरातील वृक्षगणनेबाबत विचार केले गेलेला नाही. उलट रस्ता कामासाठी तोडण्यात आलेल्या वृक्षांबाबत पालिकेकडून कोणत्याच उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.

वृक्षलागवड करण्यासंदर्भात वृक्षप्राधिकरण समितीच्या बैठका होण क्रमप्राप्त होते. मात्र, समितीच्या वर्षातून नेमक्‍या किती बैठका झाल्या. हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे पालिकेची वृक्ष संवर्धन प्राधिकरण समिती ही नुसती नावालाच असल्याचे दिसून येत आहे. 5 वर्षानंतर पालिकेच्यावतीने कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या रुंदीकरणात येणारी सुमारे 250 वृक्षांचा सर्व्हे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. ते वृक्ष पालिकेला संबंधित ठेकेदाराला ठेका देऊन त्याच्याकडून निविदा मागवून घेऊन ते तोडून घ्यावे लागणार आहे. यासाठी पालिकेकडून वृक्षांच्या फांद्या तोडण्यासाठी टेंडर नोटीसही काढण्यात आले होते. अशा प्रकारे वृक्षलागवड करण्याबाबत निर्णय न घेता वृक्षतोडीबाबत पालिकेकडून निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे वृक्षसंवर्धन व वृक्षलागवडीबाबत पालिकेचे उदासीन धोरण असल्याचे दिसून येते.

गेल्या पाच वर्षांपासून शहरात वृक्षसंवर्धन करण्यासाठी पालिकेकडून कोणतेचे उपक्रम राबवलेले नाहीत किंवा वृक्षारोपणही करण्यात आलेले नाही. वृक्षारोपणासाठी एकाही लोकप्रतिनिधींकडून पुढाकार घेतला जात नसल्याने नागरिक व पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरात अगोदरच वृक्षतोडीमुळे वृक्षांची संख्या घटत चालली असल्याने दुर्मीळ व औषधी वनस्पती नाहीशा होऊ लागल्या आहेत. अशा वृक्षांचे जतन करणे, त्यांची लागवड करण्याऐवजी त्याकडे पालिका दुर्लक्ष करत आहे.

वृक्षसंवर्धनासाठी पालिकेने ठोस उपाययोजना करणे आवश्‍यक आहेत. सन 2011-12 ची वृक्षगणनेतील वृक्षसंपदेची स्थिती लक्षात घेता शहरात एकूण 21 हजार 276 झाडे होती. यामध्ये उंच वाढणारी 3 हजार 765, झाडे, उंच डेरेदार 3 हजार 147 झाडे, मध्यम उंच व डेरेदार 3 हजार 720 झाडे, शोभेची 1 हजार 128 झाडे, औषधी वनस्पतींची 216 झाडे होती. तसेच नारळ 2107, आंबा 1292, रामफळ 716, फणस 92, जांभूळ 252, सुरू 433, निलगिरी 244, सुबाभुळ 218, साग 285, कडूलिंब 779, सिंगापूर चेरी 121, चंदन 143, अशोकाची 1303 अशी नोंद आहे. मात्र आजमितीस यातील किती झाडे अस्तित्वात आहेत. याची माहिती मिळणे अशक्‍य आहे. यासाठी पालिकेने शहरातील वृक्षसंपदेची रखडलेली गणना त्वरित पूर्ण करावी, अशीही मागणी निसर्गप्रेमी व नागरिकांमधून होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here