फांद्या तोडण्यासाठी वीजमंडळ कर्मचाऱ्यांची लगबग

सातारा – सातारा शहरातील वाढत्या अतिक्रमणाने रस्ता व्यापला असला तरी, सर्वांची सुरक्षा घेणे हे वीज वितरण कंपनीला बंधनकारक बनले आहे. तीव्र उन्हाळ्यानंतर येणाऱ्या पावसाळ्यापूर्वीच रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबावरील झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी वीजमंडळ कर्मचाऱ्यांची लगबग सुरू झालेली आहे. परंतु साताऱ्यातील नागरिकांसाठी वीजपुरवठा सुरळीत व्हावा, याची काळजी घ्यावी लागत आहे.

सातारा शहरात रस्त्यानजीक सुमारे अडीज ते तीन हजार एवढे विद्युत खांब उभे आहेत. या खांबावर शेजारील झाडाच्या फांद्या येत असल्यामुळे धोक्‍याची सूचना मिळू लागली आहे. पावसाळ्यात वादळ वाऱ्यासह अनेक झाडे कोलमडून पडतात. अशा वेळेला विद्युत तारेचेही नुकसान होते. यामुळे बारा-बारा तास विद्युत पुरवठा खंडित करावा लागतो. अशावेळी नागरिक संताप व्यक्त करतात. परंतु सातारा शहरात मंगळवारी अनेक ठिकाणी विद्युत खांबावरील फांद्या तोडण्याचे काम अविरत सुरू होते. यासाठी विद्युत पुरवठा बंद करावा लागतो. परंतू अनेक नागरिक याबाबत विचारणा करून त्वरित विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करीत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना खांबावरील फांद्या तोडण्याचे काम अर्धवट सोडावे लागत आहे.

वीज वितरण कंपनीचे हे कर्मचारी जीवावर उधार होऊन अशी धोकादायक कामे करीत असतात. सध्या वीज वितरण कंपनीमध्ये खासगीकरणाचा प्रकाशझोत सुरू झाल्यापासून कंत्राटी पद्धतीने कामगारांची भरती केली जाते. या कामगारांना वेळेत वेतन मिळत नाही. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली जात नाही. हे निदर्शनास आलेले आहे. याबाबत समाजानेच आवाज उठविला पाहिजे. कारण हे कामगार कोणाच्या तरी कुटुंबातील सदस्य असतात. त्यांना गमबूट, हेल्मेट व सुरक्षित शिडी व इतर उपकरणे उपलब्ध करणे आवश्‍यक आहे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र जगताप व वृक्षवल्ली फाउंडेशनचे शिवाजी जाधव यांनी केली आहे.

“झाडे लावा, झाडे जगवा’, असा संदेश देऊन अनेकजण सामाजिक जाणिवेतून वृक्षारोपण करतात, त्याची निगा राखतात. ही कौतुकस्पद बाब आहे. सातारा शहरात अनेक ठिकाणी रस्त्यालगत रहिवाशांनी संरक्षित भिंतीच्या बाहेर झाडे लावल्यामुळे या झाडाच्या फांद्या वाढ झाल्यानंतर विद्युत खांबाला गळाभेट घेत आहेत. वादळ वारा आल्यानंतर या फांद्यांच्या ओझ्यामुळे शॉर्टसर्किट होण्याच्या घटना घडलेल्या आहेत.

काहींना आपल्या परिसरातील नूतनीकरण करण्यासाठी सरळ झाडांवर कुऱ्हाड चालवावी लागते. विद्युत वितरण कंपनीने रस्त्यालगत असलेल्या फांद्या तोडण्याचे काम हाती घेतले आहे. अनेकजण आता सुरक्षिततेच्या दृष्टीने कारण सांगून ज्या फांद्यांचा विद्युत खांबाशी संबंध येत नाही, अशा ही झाडे व फांद्या तोडून आपला हेतू साध्य करीत आहेत. सातारा नगर पालिकेच्या वृक्ष संवर्धन समितीला साताऱ्यात कोणत्या जातीची? कोणत्या ठिकाणी झाडे आहेत? याची कल्पना नसल्यामुळे ही समिती म्हणजे, कुऱ्हाडीलाच दांड्याचा भार सहन करावा लागत आहे.

पूर्वी वृक्षसंवर्धन समिती झाडे वाचविण्याचा तसेच त्याचे संगोपण करण्याचे वट वृक्षासारखे काम करीत होते. आता राजकीय शिफारशीवरून सदस्यांची नेमणूक होत असल्याने समितीचे काम बोन्साय झाडासारखे खुजे राहिले आहे. अशी टीका सर्वत्र होऊ लागली आहे. सध्या सावली मिळत नसल्याने अनेकांना आपली वाहने उन्हात उभी करावी लागत असून त्यांना आता वृक्ष रोपणाचे महत्व पटू लागले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.