भाजपविरोधात महाविकास आघाडी
पुणे – शहराच्या उपमहापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून रिपाइंच्या गटनेत्या सुनीता वाडेकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना आघाडीतर्फे कॉंग्रेसच्या लता राजगुरू यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
येत्या 6 एप्रिल रोजी ही निवडणूक ऑनलाइन सभेत होणार आहे. पक्षीय बलाबलानुसार 162 पैकी सुमारे 98 नगरसेवक भाजपचे असल्याने वाडेकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मित्रपक्ष रिपाइंची नाराजी दूर करण्यासाठी विद्यमान उपमहापौर सरस्वती शेंडगे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.
पहिली अडीच वर्षे हे पद भाजपने रिपाइंला दिले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2017 मध्ये शेंडगे यांची नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी रिपाइंने पाचही वर्षे हे पद मिळावे, अशी मागणी केली होती. त्यावेळी शेवटच्या वर्षात हे पद रिपाइंला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.