आगामी विधानसभा लढवण्याचे सय्यद यांचे संकेत
नगर – साकळाई पाणीयोजना पुर्ण करण्याचा शब्द दिल्यानेच शिवसंग्राम संघटनेच्या वतीने अहमदनगर दक्षिणचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर करत असल्याचे प्रतिपादन शिवसंग्रामच्या महिला जिल्हाध्यक्षा दिपाली सय्यद यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, प्रदेश सरचिटणीस रावसाहेब कारखेले आदी उपस्थित होते.
यावेळी सय्यद म्हणाल्या, साकळाई पाणीयोजना भाजप सरकार पुर्ण करु शकते असा विश्वास वाटल्याने आपण या मतदार संघातील भाजप उमेदवारास पाठिंबा देत आहोत. तसेच शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांच्या आदेशानुसार आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत सय्यद यांनी यावेळी दिले. तसेच लोकसभा निवडणुकीत डॉ. विखे यांच्या प्रचारात सक्रिय सहभागी होण्याचे तसेच स्वत:च्या सोशल मीडियावरही विखे यांचा प्रचार करणार असल्याचे सय्यद यांनी यावेळी सांगितले. डॉ. सुजय विखे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नाला योग्य न्याय देण्यासाठी डॉ. विखे हे योग्य उमेदवार आहेत. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्नही सुटतील असा विश्वास सय्यद यांनी यावेळी व्यक्त केला.