हवेली पंचायत समिती उपासभापती नारायण आव्हाळे
पुणे – हवेली पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे नारायण गुलाबराव आव्हाळे यांची बिनविरोध निवड झाली. इतिहासात पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या हवेली पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. महाविकास आघाडीच्या एकजुटीने शिवसेनेला ही संधी मिळाली असून, हीच एकजुट प्रत्येक निवडणुकीत पहायला मिळाली तर नक्कीच महाविकास आघाडीची ताकद आणखीन वाढेल.
हवेली पंचायत समिती उपाध्यक्षपदाची निवडणुक प्रक्रिया बुधवारी (दि. 3) निवडणुक निर्णय अधिकारी सचिन बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के उपस्थित होते.
पंचायत समिती सभापती निवडीला शिवसेना, कॉग्रेसने पाठिंवा देत राष्ट्रवादीला सभापतीचा बहुमान मिळाला. त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी धर्म पाळण्यात आला.
आघाडीच्या या विश्वासावर आज शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेत उपसभापतीपदासाठी शिवसेनेचे नारायण आव्हाळे यांची शिफारस करण्यात आली. त्यानुसार दुपारी 1 वाजून 10 मिनटांनी आव्हाळे यांनी उपसभापती पदासाठी आपला उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला.
अर्ज भरण्याच्या मुदतीमध्ये अन्य उमेदवारांचा अर्ज न आल्यामुळे, आव्हाळे यांचा अर्ज छाणणीनंतर मंजुर करत बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
एकदिलाने निवडणूक…
महाविकास आघाडीच्या एकीमुळे आज शिवसेनेचा हवेली पंचायत समितीवर भगवा फडकला. या निवडीमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला. तसेच अनिष्ठ प्रथांना बाजूला ठेवून एकदिलाने निवडणूक कशी होऊ शकते हे यातून दिसून येते. त्यासाठी विश्वासाची साथ महत्वाची असून, याच विश्वासामुळे शिवसेनेला मोठी संधी मिळाली. त्यामध्ये तीनही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली, अशी भावना शिवसेना जिल्हा प्रमुख माऊली कटके आणि रमेश कोंडे यांनी व्यक्त केली.
इतिहास पहिल्यांचा शिवसेनेला मिळाली संधी
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पुणे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी कधी संधी मिळणार? असा प्रश्न प्रत्येक शिवसैनिकाकडून विचारला जात होता. मात्र, आज पंचायत समितीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच उपसभापती पदाचा बहुमान शिवसेनेला मिळाला. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य तसेच शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून नेहमीच शिवसेनेवर अन्याय होत असल्याचे पक्षप्रमुखांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, आज महाविकास आघडीच्या माध्यमातून शिवसेनेला संधी मिळाली.